ज्योतिषशास्त्रावर विश्वास नव्हता, पण अ‍ॅस्ट्रॉलॉजी अ‍ॅप बनवलं; दररोज होतेय ३० लाखांची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 11:52 AM2023-11-19T11:52:33+5:302023-11-19T12:24:29+5:30

अशा व्यक्तीबद्दल सांगत आहोत जे ज्योतिष शास्त्रामुळे दररोज ३० लाख रुपयांची कमाई करत आहे.

ज्योतिषशास्त्रात अनेकांनाच रस असतो. यामुळेच अनेक ठिकाणी ज्योतिषशास्त्राशी संबंधित कार्यक्रमांचा एक विभाग असतो. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबद्दल सांगत आहोत, ज्याचा ज्योतिषाशास्त्रावर अजिबात विश्वास नव्हता पण आज तो ज्योतिष शास्त्रामुळे दररोज ३० लाख रुपयांची कमाई करत आहे.

आम्ही सांगत आहोत, ऑनलाइन ज्योतिषशास्त्राशी संबंधित असलेल्या अॅस्ट्रोटॉक या स्टार्टअपचे संस्थापक पुनीत गुप्ता यांच्याबद्दल. दिल्लीचे रहिवासी आणि इंजिनिअर असलेल्या पुनीत गुप्ता यांचा ज्योतिषशास्त्रावर कधीच विश्वास नव्हता. मग असं काय झालं की त्यांनी ज्योतिषशास्त्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि जगातील सर्वात मोठी अॅस्ट्रोलॉजी कंपनी तयार केली.

अॅस्ट्रोटॉक (Astrotalk) ही जगातील सर्वात मोठी अॅस्ट्रोलॉजी कंपनी आहे. गेल्या चार वर्षांत जगभरातील दोन कोटींहून अधिक लोकांनी या सेवांचा लाभ घेतला आहे. आज अॅस्ट्रोटॉक दररोज सुमारे ४१ लाख रुपयांचा व्यवसाय करत आहे. पुनीत गुप्ता आपल्या भविष्याबाबात चिंतेत असतानाच त्यांना एका ज्योतिषानं अॅस्ट्रोलॉजी क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला.

पुनीत यांनी हा सल्ला स्वीकारला आणि आज ते कोट्यधीश आहेत. पुनीत गुप्ता २०१५ साली मुंबईतील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करत होते. परंतु त्यांना नोकरी सोडून स्वतःचं आयटी स्टार्टअप सुरू करायचं होतं.

पण बहुतेक लोकांप्रमाणे पुनीत यांच्याही मनात नोकरी सोडणं योग्य आहे की नाही ही द्विधा मन:स्थिती होती. यावेळी एका सहकाऱ्यानं त्यांच्या समस्येचं कारण विचारलं. त्या ज्योतिष क्षेत्रातील तज्ज्ञही होत्या. समस्येचे कारण जाणून घेतल्यानंतर, त्यांनी ज्योतिषशास्त्राद्वारे उपाय शोधण्यात मदत करण्याची ऑफर दिली. पण पुनीत यांचा त्यावेळी ज्योतिषावर अजिबात विश्वास नव्हता.

यामुळेच ते त्यांच्या बोलण्यावर तो हसले. शिक्षित व्यक्ती ज्योतिषावर कसा विश्वास ठेवू शकतो? असं त्यांच्या मनात आलं. पण त्या व्यक्तीला ज्योतिषाच्या ज्ञानावर पूर्ण विश्वास होता आणि त्यांनी पुनीत यांना त्यांच्या भूतकाळाबद्दल सर्व काही सांगू शकत असल्याचं म्हटलं.

त्यांनी पुनीत यांच्या भूतकाळाबद्दल अचूक माहिती दिली. पण पुनीत यांचा यावर विश्वास बसला नाही. आपल्या कोणत्या मित्राकडून भूतकाळाबद्दल ऐकले असावं असं त्यांना वाटलं. त्यांना असंही सांगण्यात आलं की ते लवकरच त्याच्या एका मित्रासोबत आयटी स्टार्टअप सुरू करणार आहे. पण हा स्टार्टअप दोन वर्षांत बंद होईल कारण पार्टनर त्यांना सोडून जाईल. काही काळानंतर पुनीत आणखी एक स्टार्टअप सुरू करतील, जो खूप यशस्वी होईल, असं त्यांना सांगण्यात आलं. पुनीत यांचा यावर विश्वास बसेना. त्यानंतर आयटी कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांची भविष्यवाणी अगदी खरी ठरली. कंपनीचा व्यवसाय चांगला चालला असताना अचानक दोन वर्षांनी पुनीत यांच्या पार्टनरनं त्यांची आयटी कंपनी सोडली. तेव्हा पुनीत यांना त्यांची आठवण झाली. त्यांनी त्यांचा नंबर मिळवत त्यांनी सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचं म्हटलं. मग त्यांनी पुनीत यांना अॅस्ट्रोलॉडी क्षेत्रात काहीतरी करायचं सुचवलं. असा व्यवसाय त्यांच्यासाठी खूप यशस्वी ठरेल, असही त्यांनी सांगितलं. त्यानंतर पुनीत यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये अॅस्ट्रोटॉक सुरू केलं. कंपनीने मोठी प्रगती केली. दोन वर्षांतच ती जगातील सर्वात मोठी अॅस्ट्रो कंपनी बनली.

पुनीत म्हणतात की, Astrotalk च्या यशाचे रहस्य म्हणजे प्रतिभावान ज्योतिषांची नेमणूक करणं आणि पूर्ण प्रामाणिकपणे व्यवसाय करणं हे आहे. सुरुवातीला प्रतिभावान ज्योतिषी शोधणं हे सर्वात मोठे आव्हान होतं. देशभरातून हजारो बायोडेटा प्राप्त होतात, परंतु पाच टक्क्यांहून कमी ज्योतिषी आमची मुलाखत प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अॅस्ट्रोटॉकच्या लोकप्रियतेचं एक कारण म्हणजे १०० टक्के गोपनीयतेचं धोरण. यावर ग्राहक ज्योतिषांशी एकांतात चर्चा करू शकतात आणि बोलू शकतात.

पुनीत गुप्ता यांचा दावा आहे की अॅस्ट्रोटॉकचं रोजचं उत्पन्न ३० लाखांपेक्षा जास्त आहे. कंपनीसोबत १६०० पेक्षा जास्त ज्योतिषी काम करत आहेत. चॅट आणि कॉलवर दररोज १,८०,००० मिनिटांपेक्षा जास्त वेळ सल्ला दिला जात असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे याचे बहुतांश ग्राहक तरुण आहेत. त्यांचं ९० टक्के उत्पन्न ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांकडून येतं. दररोज सुमारे ५५ हजार लोक अॅप अॅक्सेस करतात. केवळ भारतातीलच नाही तर परदेशातील लोक त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अॅस्ट्रोटॉकच्या ज्योतिषांचा सल्ला घेत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.