जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:53 IST2025-11-19T15:39:59+5:302025-11-19T15:53:00+5:30

Most Expensive Retail Location : कुशमॅन अँड वेकफिल्डच्या ताज्या 'मेन स्ट्रीट्स अक्रोस द वर्ल्ड २०२५' अहवालानुसार, जगातील सर्वात महागड्या हाय-स्ट्रीट रिटेल ठिकाणांच्या यादीत भारतातील काही रस्त्यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे.

दिल्लीचे खान मार्केट जगातील सर्वात महागड्या हाय-स्ट्रीट रिटेल ठिकाणांच्या यादीत एका पायरीने घसरून २४ व्या स्थानावर पोहोचले आहे. मात्र, ते देशातील सर्वात महागडे हाय-स्ट्रीट मार्केट अजूनही कायम आहे.

खान मार्केटमधील वार्षिक भाडे सध्या १९,७४९ प्रति चौरस फूट (२२३ डॉलर) एवढे आहे. हे भाडे भारतातील इतर कोणत्याही हाय-स्ट्रीटपेक्षा जास्त आहे.

लंडनची 'न्यू बॉन्ड स्ट्रीट' जगातील सर्वात महागडी रिटेल डेस्टिनेशन बनली आहे, जिथे वार्षिक भाडे सुमारे १,९७,६६८ रुपये प्रति चौरस फूट (२,२३१ डॉलर) आहे.

न्यू बॉन्ड स्ट्रीट नंतर मिलानची 'विया मोंटे नेपोलेओने' (सुमारे ₹१,९३,१४४ प्रति चौरस फूट) दुसऱ्या, तर न्यूयॉर्कची 'अपर फिफ्त अव्हेन्यू' (सुमारे ₹१,७७,१४० प्रति चौरस फूट) तिसऱ्या स्थानावर आहे.

मर्यादित मॉल पुरवठ्यामुळे, खान मार्केट, कनॉट प्लेस आणि गुरुग्राममधील गॅलेरिया मार्केट यांसारखी हाय-स्ट्रीट ठिकाणे आता आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ब्रँड्ससाठी महत्त्वाची केंद्रे बनत आहेत.

एशिया-पॅसिफिक क्षेत्रात भारतातील टियर-१ शहरांमध्ये भाड्यामध्ये सर्वात वेगाने वाढ नोंदवली गेली आहे. यामध्ये गुरुग्रामच्या गॅलेरिया मार्केटमध्ये २५% वाढ, दिल्लीच्या कनॉट प्लेसमध्ये १४% वाढ आणि मुंबईच्या केंप्स कॉर्नरमध्ये १०% वाढ झाली आहे.

ट्रॅक केलेल्या १६ भारतीय हाय-स्ट्रीट लोकेशन्समध्ये सरासरी वार्षिक भाडे वाढ ६% एवढी नोंदवली गेली आहे, जी प्रीमियम रिटेल मागणी वाढल्याचे स्पष्ट संकेत देते.

विशेष म्हणजे, एशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात स्वस्त हाय-स्ट्रीट देखील भारतातच आहे. चेन्नईच्या अन्ना नगर सेकंड अव्हेन्यू येथे वार्षिक भाडे मात्र केवळ २,२१४ रुपये प्रति चौरस फूट (२५ डॉलर) आहे.