पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या चिंतेत असलेल्यांसाठी मोठी बातमी; पुढील २ आठवड्यांमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 09:36 PM2022-03-09T21:36:20+5:302022-03-09T21:39:18+5:30

गेल्या १०० पेक्षा अधिक दिवसांपासून देशात इंधन दरवाढ नाही; निवडणुका संपल्यानं दरवाढीची दाट शक्यता असताना महत्त्वाची माहिती पुढे आली आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम शेअर बाजार आणि आंतरराष्ट्रीय तेल बाजारात पाहायला मिळत आहे. खनिज तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादल्यापासून खनिज तेलाचे दर वाढले आहेत.

अमेरिकेनं कालच रशियाकडून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू न घेण्याचा निर्णय जाहीर केला. युरोपियन देशांनीदेखील रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे खनिज तेलाचा दर १४ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीयांना दिलासा देणारी बातमी आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे गेल्या १०० हून अधिक दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेले नाहीत. मात्र आता मतदान संपल्यानं भारतीयांना इंधन दरवाढीची चिंता सतावू लागली आहे. मात्र एका मोठ्या सरकारी तेल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. कारण परिस्थिती लवकरच सुधारणार आहे.

सध्या उच्चांकी पातळीवर असलेले खनिज तेलाचे दर पुढील २ आठवड्यांमध्ये उतरतील, असं बीपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरुण कुमार सिंह यांनी सांगितलं. ईटी वृत्तपत्राला त्यांनी ही माहिती दिली. दोन आठवड्यांत खनिज तेलाचा दर १०० डॉलरच्या खाली येईल, असं सिंह म्हणाले.

सध्या असलेला खनिज तेलाचा दर जग फार काळ सहन करू शकणार नाही. असेच दर कायम राहिल्यास तेलाची मागणी २-३ दिवसांत घटेल. युक्रेन-रशिया युद्धातून मार्ग निघाल्यास खनिज तेल ९० डॉलर प्रति बॅरलच्या खाली येईल, असं सिंह यांनी सांगितलं.

बीपीसीएलला पुढील महिन्यात दोन कार्गोंची डिलिव्हरी मिळणार असल्याची माहिती सिंह यांनी दिली. भारतीय रिफायनिंग कंपन्या स्पॉट मार्कटमधून ३० ते ४० टक्के खरेदी करतात. बीपीसीएलनं रशियाकडून खरेदी केलेलं खनिज तेल स्पॉट मार्केटमधूनच विकत घेतलेलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

लाँग टर्म डीलच्या माध्यमातूनही खनिज तेल खरेदी केलं जातं. सगळ्याच कंपन्यांकडे एक महिन्याचा तेल साठा असतो. सध्या रिफायनिंग कंपन्यांकडे मेपर्यंत पुरेल इतका खनिज तेलाचा साठा आहे, अशी माहिती सिंह यांनी दिली.

नोव्हेंबरपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेले नाहीत. परवाच उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यातलं मतदान झालं. उद्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात झालेली वाढ पाहता पेट्रोल, डिझेलचे दर लीटरमागे ३० रुपयांनी वाढवण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.