विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 09:58 PM2024-05-21T21:58:30+5:302024-05-21T22:00:39+5:30

लोकसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात कुटुंबातील एखादा तरुण चेहरा पुढे करतील, असं बोललं जात आहे.

Sharad Pawar is likely to field Yugendra Pawar against Ajit Pawar in the Baramati assembly elections | विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!

विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!

Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघात झालेली पवार विरुद्ध पवार राजकीय लढाई चांगलीच चर्चिली गेली. या लढाईचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात कुटुंबातील एखादा तरुण चेहरा पुढे करतील, असं बोललं जात आहे. अशातच याबाबतच्या थेट प्रश्नाला शरद पवार यांनी चाणाक्षपणे उत्तर देत लगेच आपले पत्ते उघड करणं टाळलं आहे.

शरद पवार यांना एका यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीदरम्यान बारामती विधानसभेच्या संभाव्य उमेदवाराबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना पवार यांनी म्हटलं आहे की, "उमेदवार कोण असेल, हे आज सांगता येणार नाही. विधानसभा निवडणुकीला आणखी वेळ आहे. लोकसभा निवडणुकीचं चित्र कसं होतंय, उद्या देशात कोणाची सत्ता येतेय, महाराष्ट्रात भाजपची काय स्थिती राहतेय, या गोष्टी पाहाव्या लागतील. भविष्यात भाजपची सत्ता महाराष्ट्रात येऊ नये, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. या गोष्टीला महाराष्ट्रातील ठिकठिकाणी जे सोईचे उमेदवार असतील, ते देण्याचा आमचा प्रयत्न राहील. निदान मी तरी त्याबाबत अद्याप विचार केलेला नाही."

दरम्यान, शरद पवार हे आपल्या राजकीय डावपेचांचा अंदाज शेवटच्या क्षणापर्यंत येऊन देत नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीबाबतही पवार आपल्या याच इतिहासाची पुनरावृत्ती करणार का, हे पाहावं लागेल. कारण अजित पवारांचे सख्ख्ये पुतणे युगेंद्र पवार यांची लोकसभा निवडणुकीपासून बारामती आणि परिसरातील सक्रियता वाढली असून त्यांनी जनसंपर्क वाढवण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे.

सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याच्या भाजपकडून सूचना?

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी तिकीट दिलं. भाजपच्या आग्रहामुळेच अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता. या मुद्द्यावरून मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शरद पवार म्हणाले की, "याबाबत माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. मात्र बाहेर अशी चर्चा आहे की, तुम्ही आमच्यासोबत आलाय ते स्पष्टपणे दाखवण्यासाठी बारामतीतून सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी द्या, असं भाजपकडून अजित पवार यांना सुचवण्यात आलं होतं. भाजपच्या कामाची पद्धत सर्वांना माहीत आहे. ते जे ठरवतात ते ऐकावं लागतं," असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.

 
 

Web Title: Sharad Pawar is likely to field Yugendra Pawar against Ajit Pawar in the Baramati assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.