Credit Card Dues: होऊ दे खर्च...! लोकांची क्रेडिट कार्डावर तुफान खरेदी, थकबाकी पहिल्यांदाच २ लाख कोटींच्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 09:50 AM2023-06-26T09:50:29+5:302023-06-26T10:00:33+5:30

क्रेडीट कार्डद्वारे पेमेंट करण्याचा ट्रेंड देशात झपाट्यानं वाढत आहे. गेल्या वर्षभरात देशातील क्रेडिट कार्डाची थकबाकी ३० टक्क्यांनी वाढली आहे.

क्रेडीट कार्डद्वारे पेमेंट करण्याचा ट्रेंड देशात झपाट्यानं वाढत आहे. गेल्या वर्षभरात देशातील क्रेडिट कार्डाची थकबाकी ३० टक्क्यांनी वाढली आहे. एकूण बँक कर्जाच्या तुलनेत हे जवळपास दुप्पट वाढलं आहे. एप्रिलमध्ये क्रेडिट कार्डची थकबाकी तब्बल २ लाख कोटींच्या पुढे गेली. पहिल्यांदाच क्रेडिट कार्डाची थकबाकीनं इथपर्यंत पोहोचली आहे.

दरम्यान, यावर बँकांनीदेखील प्रतिक्रिया दिली असून हा चिंतेचा विषय नसल्याचं म्हटलंय. हा हिस्सा बऱ्यापैकी कमी असल्याचं बँकांचं म्हणणं आहे. पण दुसरीकडे रिझर्व्ह बँकेनं अनसिक्युर्ड बँक क्रेडिट वाढीवर मात्र चिंता व्यक्त केली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार एप्रिल २०२३ मध्ये क्रेडिट कार्ड बॅलन्स २,००,२५८ कोटी रुपयांवर पोहोचला, जो गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत २९.७ टक्क्यांनी अधिक आहे. क्रेडिट कार्डाच्या वाढत्या थकबाकीचा अर्थ लोकांवर कर्जाचा आकडा वाढत आहे. सोबतच हे क्रेडिट कार्डाचा वाढता वापरही दर्शवत आहे.

ग्राहक क्रेडिट कार्डचा वापर वाढल्यानं बँलन्सशीटमध्ये वाढ झाली असल्याची माहिती अॅक्सिस बँकेचे अध्यक्ष आणि प्रमुख (कार्ड्स आणि पेमेंट्स) संजीव मोघे यांनी दिली. गेल्या वर्षभरात कन्झुमर स्पेंडिंगमध्ये वाढ झाली आहे.

एप्रिल २०२३ मध्ये क्रेडिट कार्डद्वारे १.३ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. क्रेडिट कार्डचे व्यवहार वाढले याचा अर्थ ग्राहकांचा आत्मविश्वास वाढत आहे. परंतु थकबाकी वाढणं म्हणजे लोक समान खरेदीसाठी अधिक पैसे देत आहेत. परंतु आऊटस्टँडिंग वाढण्याचा अर्थ लोकांना सामानाच्या खरेदीसाठी अधिक पेमेंट करावं लागत आहे.

टोटल बँक क्रेडिटमध्ये कार्ड बँलन्सचा हिस्सा १.४ टक्के आहे. पर्सनल लोनमध्ये हा हाऊसिंग (१४.१ टक्के) आणि ऑटो लोननंतर (३.७ टक्के) तो सर्वाधिक आहे. २००८ च्या ग्लोबल फायनॅन्शिअल क्रायसिसपूर्वी क्रेडिट कार्डाची थकबाकी १.२ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. यानंतर एका दशकापर्यंत ती १ टक्क्यांच्या खाली राहिली. ऑगस्ट २०१९ मध्ये यानं १ टक्क्यांपेक्षा अधिक झाली आणि नंतर त्यात सातत्यानं वाढ होत आहे.

बँकर्सनुसार आजची स्थिती २००८ पेक्षा थोडी निराळी आहे. आता केवळ त्याच लोकांना क्रेडिट कार्ड दिलं जातं, जे कर्ज फेडण्यात सक्षम आहेत. खर्च वाढणं आणि मल्टिकार्ड ओवनरशिपनंतरही भारताचा नंबर त्याच देशांमध्ये येतो ज्या ठिकाणी क्रेडिट कार्डाचा वापर कमी आहे.

लोकसंख्येच्या हिशोबानं पाहिलं तर भारतात पाच टक्क्यांपेक्षाही कमी लोकांकडे क्रेडिट कार्ड आहे. अन्य विकसनशील देशांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार गेल्या १२ महिन्यांमध्ये बँक क्रेडिटमध्ये क्षेत्राचा हिस्सा २६.३ टक्क्यांवरून कमी होऊन २४.३ टक्के झालीये.