Petrol Price: पेट्रोल, डिझेल स्वस्त होऊ शकते का? जाणून घ्या कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 10:47 AM2021-08-24T10:47:43+5:302021-08-24T10:53:48+5:30

Petrol Price cut: पेट्रोलची देशातील आजची किंमत सरासरी १०१ रुपये प्रतिलिटर, डिझेलची आजची किंमत सरासरी ९१ रुपये प्रतिलिटर आहे.

पेट्रोलची शंभरी बरीच गाजली. डिझेलनेही पेट्रोलच्या पाठोपाठ शंभरीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी अनोख्या पद्धतीने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीविरोधात आंदोलन करण्यात आले.

मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींकडे बोट दाखवून केंद्र सरकारने इंधनाच्या दरांमध्ये कपात करण्यास नकार दिला. परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल घसरणीला लागलेले असले तरी त्या मानाने आपल्याकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्यास तयार नाहीत.

पेट्रोलची देशातील आजची किंमत सरासरी १०१ रुपये प्रतिलिटर, डिझेलची आजची किंमत सरासरी ९१ रुपये प्रतिलिटर

इंधनाच्या दरात प्रतिलिटर २० पैशांनी कपात झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत घसरल्याने इंधनाच्या दरांत किंचित कपात करण्यात आली.

पेट्रोलच्या दरांमध्ये तब्बल ३६ दिवसांनंतर किंचित कपात झाली आहे. तर डिझेलच्या दरांमध्ये ३३ दिवसांपासून काहीच उतार नव्हता.

१८ ऑगस्टपासून त्यात थोडी घसरण नोंदविण्यात आली. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना इंधनाच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही, हे विशेष.

गेल्या महिन्यात कच्च्या तेलाने ७५ डॉलर प्रतिबॅरल एवढी उंची गाठली होती. आता ही किंमत ६६ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत उतरली आहे. त्यानुसार देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती दीड ते दोन रुपयांनी कमी व्हायला हव्या होत्या.

वस्तुत: इंधनाच्या दरात एक डॉलरने घसरण झाली तरी देशांतर्गत इंधनाच्या किमती ४५ ते ५० पैशांनी घटणे गरजेचे आहे.

मे ते जुलै या दरम्यान भारतीय बाजारपेठेत कच्चे तेल साडेसहा डॉलर प्रतिबॅरल एवढे वाढले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारानुसार ज्यावेळी भारतात इंधनाच्या दरात प्रतिलिटर साडेतीन रुपये वाढ होणे अपेक्षित असताना ती वाढ सात रुपये प्रतिलिटर अशी झाली.

साहजिकच कच्च्या तेल्याच्या किमती जेव्हा घसरतात तेव्हाही हेच सूत्र लागू होते. म्हणून तूर्तास पेट्रोल-डिझेलचे दर दीड ते दोन रुपयांनी कमी न होता २० पैशांनी कमी झाल्या आहेत.