सामान्यांच्या खिशाला कात्री, देशातील 'या' मोठ्या बँकेनं वाढवले व्याजदर; वाढणार EMI

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 09:33 AM2023-07-15T09:33:31+5:302023-07-15T09:40:33+5:30

SBI Interest Rates Hike : बँकेनं MLCR मध्ये केली वाढ, आजपासून लागू होणार नवे दर.

SBI Interest Rates Hike : महागाईनं आधीच लोकांच्या खिशावर मोठा ताण पडला आहे. तर दुसरीकडे, देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयनं आपल्या कर्जदारांना मोठा धक्का दिला आहे. तुम्हीही स्टेट बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) व्याजदरात वाढ केली आहे.

याचा थेट परिणाम तुमच्या गृहकर्जाच्या ईएमआयवर (EMI) होईल. स्टेट बँकेनं मार्जिनल कॉस्ट आधारित व्याजदर म्हणजेच MCLR ०.०५ टक्क्यांनी वाढवला आहे. स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एमसीएलआरमध्ये वाढ सर्व मुदतीच्या कर्जांसाठी करण्यात आली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जदारांसाठी मासिक हप्ता म्हणजेच ईएमआय वाढणार आहे.

SBI ने एमएलसीआर दर वाढवले ​​आहेत. शुक्रवारी बँकेनं त्यात ०.०५ टक्क्यांनी वाढ केली. व्याजदर वाढल्यानं कर्ज महाग होईल, तुमचा ईएमआय वाढेल. हे नवीन दर १५ जुलै २०२३ पासून लागू होणार आहेत.

बँकेच्या निर्णयानंतर ओव्हरनाईट एमएलसीआर ७.९५ टक्क्यांवरून ८ टक्के करण्यात आला आहे. त्याचवेळी एका महिन्यासाठी ८.१५ टक्के, तीन महिन्यांसाठी ८.१५ टक्के, ६ महिन्यांसाठी ८.४५ टक्के, १ वर्षासाठी ८.५५ टक्के, दोन वर्षासाठी ८. ६५ टक्के आणि तीन वर्षांसाठी ८.७५ टक्के करण्यात आलेत.

बँकेच्या या निर्णयाचा परिणाम स्थिर व्याजदरावर कर्ज घेतलेल्यांना न होता फ्लोटिंग व्याजदरावर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे. एमसीएलआर वाढल्यानंतर, ईएमआय फक्त रीसेट डेटवरच वाढेल. एमएलसीआर दर वाढल्याने, गृहकर्जाचे ईएमआय तसंच वाहन कर्ज देखील महाग होणार आहे.

एमएलसीआर हा प्रत्यक्षात किमान व्याजदर आहे, ज्याच्या खाली कोणतीही बँक ग्राहकांना कर्ज देऊ शकत नाही. बँकांना त्यांचा ओव्हरनाईट, एक महिना, तीन महिने, सहा महिने, एक वर्ष आणि दोन वर्षांचा एमएलसीआर दर महिन्याला जाहीर करणे बंधनकारक आहे.

एमएलसीआर मध्ये वाढ म्हणजे गृहकर्ज, वाहन कर्ज यांसारख्या मार्जिनल कॉस्टशी निगडीत कर्जावरील व्याजदर वाढतील. त्याची गणना कर्जाच्या कालावधीच्या आधारावर केली जाते. म्हणजेच, कर्जदाराला कर्जाची परतफेड करण्यासाठी किती वेळ लागतो या आधारावर त्याची गणना केली जाते.