होम लोनच्या EMI मध्ये दोन वर्षांत २०% ची वाढ, कसं पूर्ण होणार मध्यमवर्गीयांचं स्वप्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 09:41 AM2023-08-03T09:41:15+5:302023-08-03T10:00:43+5:30

आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण घरांच्या किंमती पाहता होम लोन घेऊनच ते स्वप्न पूर्ण करण्याशिवाय पर्याय नसतो.

आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण घरांच्या वाढत्या किंमती पाहता होम लोन घेऊनच ते स्वप्न पूर्ण करण्याशिवाय पर्याय नसतो. पण गेल्या काही महिन्यांमध्ये होम लोनच्या दरात मोठी वाढ झालीये. त्याचा मोठा बोजा ग्राहकांच्या खिशावरही पडत आहे.

महागड्या व्याजाचा सर्वात मोठा परिणाम परवडणाऱ्या घरांच्या विक्रीवर झाला आहे. प्रॉपर्टी कन्सल्टन्ट अॅनारॉकच्या रिपोर्टनुसार, महासाथीचा सर्वाधिक फटका परवडणाऱ्या घरांच्या कॅटेगरीला बसला आहे. २०२३ च्या पहिल्या सहा महिन्यांत परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत जवळपास २० टक्क्यांनी घट झाली आहे.

याचं सर्वात मोठे कारण म्हणजे ईएमआयच्या ओझ्यातील विक्रमी वाढ. परवडणाऱ्या घरांच्या सेगमेंटमध्ये ईएमआयचा बोजा गेल्या २ वर्षांत २० टक्क्यांनी वाढला आहे. अॅनारॉक ग्रुपचे संशोधन प्रमुख प्रशांत ठाकूर सांगतात की, २० वर्षांत एकूण व्याज मुद्दलापेक्षा जास्त होत आहे. हेच कारण आहे की २०२३ च्या पहिल्या सहामाहीत २० टक्के आणि २०२२ याच कालावधीत विक्रीत ३१ टक्क्यांची घट झालीये.

सध्या रिझर्व्ह बँकेनं सलग दोन वेळा रेपो रेट स्थिर ठेवले, तरी बँकांनी व्याजदर वाढवले आहे. सद्यस्थितीतील उदाहरण द्यायचं झालं तर या महिन्याच्या सुरूवातीलाच तीन बँकांनी व्याजदर वाढवले.

आयसीआयसीआय, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेनं १ ऑगस्टला एमएलसीआर वाढवला. यानंतर बँकांचे व्याजदर आणि लोकांच्या खिशावरील ईएमआयचा बोजा वाढला.

पुन्हा वाढत्या महागाईमुळे रिझर्व्ह बँकेला या महिन्यात होणाऱ्या बैठकीत पुन्हा रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सनराइज ग्रुपचे संस्थापक बीसी जैन यांच्या मते, परवडणाऱ्या घरांच्या कमी विक्रीमागे अनेक कारणं आहेत.

वाढती महागाई आणि ईएमआय वाढणे हे प्रमुख कारण आहेच, पण याशिवाय मागणी आल्यानं प्रॉपर्टीच्या किंमतीत वाढ, लँड कॉस्टमध्ये तेजी आणि कन्स्ट्रक्शनसाठी होणारा खर्च वाढल्यानंही परिणाम होत आहे. सरकारनं या सेगमेंटमधील घर खरेदीधारकांना काही सूट दिली पाहिजे, असंही जैन म्हणाले.

काही प्रमुख समस्या पुढील प्रमाणे आहेत. ३० लाखांपर्यंत फ्लोटिंग घेणाऱ्यांपुढे समस्या निर्माण झाली आहे. फ्लोटिंग व्याजदर २०२१ मध्ये ६.७ टक्क्यांवरून वाढून ९.१५ टक्के झालेत. जुलै २०२१ मध्ये ईएमआय २२,७०० रुपये होता, जो आता वाढून २७,३०० रुपये झालाय. २० वर्षांच्या कालावधीसाठी एकूण इंटरेस्ट आता प्रिन्सिपटल अमाऊंटपेक्षा अधिक झालाय. आरबीआयनं या दरम्यान रेपो दरात जवळपास २५० बीपीएसची वाढ केलीये.