Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:18 PM2024-05-16T12:18:37+5:302024-05-16T12:31:43+5:30

देशांतर्गत बाजारात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. सध्या सोन्याचा दर साधारणपणे 73,000 रुपये एवढा आहे.

गुंतवणूक करण्यासाठी योग्य काय, सोने की शेअर्स? असा प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदारांना अनेकदा पडतो. गेल्या पाच वर्षांचा विचार करता, या कालावधीत सोन्याने 18 टक्के एवढा वार्षिक परतावा दिला आहे, तर निफ्टीमध्ये सुमारे 15 टक्के एवढी वाढ झाली आहे.

मात्र आपण, एक, तीन, 10 आणि 15 वर्षांचा विचार केला, तर निफ्टीने सोन्याच्या तुलनेत अधिक परतावा दिला आहे. गेल्या सात वर्षांच्या कालावधीत, परतावा साधारणपणे समान राहिला. या कालावधीत निफ्टीने 15 टक्के CAGR वर परतावा दिला आहे, तर सोन्याने 14 टक्के एवढा परतावा दिला आहे.

ॲम्बिट ग्लोबल प्रायव्हेट क्लायंटच्या सीईओ अमृता फरमाहान यांच्या एका अहवालाच्या दाव्यानुसार, या वर्षात आत्तापर्यंत, जागतिक पातळीवर सोन्याचा दर सुमारे 20% ने वाढून सुमारे 2,390 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात काही काळासाठी, सोन्याचा दर 2,400 डॉलरवरही पोहोचला होता. जो आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे.

देशांतर्गत बाजारात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. तर, एमसीएक्सवर 75,000 रुपयांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर होता. सध्या सोन्याचा दर साधारणपणे 73,000 रुपये एवढा आहे.

यासंदर्भात फरमाहान यांनी म्हटले आहे की, सोन्याच्या दर वाढीची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे, जगातील अनेक प्रमुख केंद्रीय बँकांमध्ये सोने खरेदीची स्पर्धा सुरू आहे. यामध्ये चीन, भारत आणि रशियाचा समावेश आहे.

युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने रशियाची डॉलरमधील मालमत्ता गोठवली आहे. त्यामुळे, जागतिक गुंतवणूकदारांचा डॉलरवरील विश्वास कमी झाला आहे. यामुळे केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी केली जात आहे. सोन्याच्या स्वीकारार्हतेमुळे त्याच्याकडे जागतिक चलनाच्या स्वरुपातही बघितले जाते. यामुळे सोन्याचा दर वाढत आहे.

सोन्याचा दर वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे, चीनमधील सेंट्रल बँकेसोबतच सर्वसामान्य लोकही मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहेत. चीनमधील रिअल इस्टेट गंभीर संकटात आहे आणि शेअर बाजाराची स्थितीही वाईट आहे. यामुळेच लोक सोन्यात अधिकाधिक गुंतवणूक करत आहेत.

विशेष म्हणजे, अमेरिकेतील किरकोळ गुंतवणूकदारही याच मार्गावर जाण्याची शक्यता आहे.

टीप - येथे केवळ सोने आणि शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.