साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना शुभ-फलदायी, पैशांचा ओघ राहील; ४ राशींना संघर्ष, संमिश्र काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 09:06 IST2026-01-11T08:54:45+5:302026-01-11T09:06:38+5:30
Weekly Horoscope: ११ जानेवारी २०२६ ते १७ जानेवारी २०२६ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात शुक्र, रवि, मंगळ आणि बुध यांचा राशीपालट आहे. हर्षल वृषभ राशीत, गुरू मिथुन राशीत, तर केतु कन्या राशीत आहे. शुक्र, रवि, मंगळ आणि बुध धनू राशीत असून, दि. १२ रोजी शुक्र, दि. १४ रोजी रवि, दि. १५ रोजी मंगळ, तर दि. १७ रोजी बुध मकर राशीत प्रवेश करील. प्लूटो मकर राशीत आहेच. राहु कुंभ राशीत, तर शनि आणि नेपच्युन मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण तूळ, वृश्चिक आणि धनु या राशींमधून राहील. या सप्ताहात दि. १३ रोजी भोगी व धनुर्मास समाप्ती आहे. दि. १४ रोजी मकर संक्रांत व षट्तिला एकादशी आहे. दि. १५ रोजी कर आहे. तर दि. १६ रोजी प्रदोष आहे. याच दिवशी मासिक शिवरात्रि आहे.

६ दिवसांत ४ ग्रहांचे होणारे गोचर अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. शनिचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. कुटुंब, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, करिअर, व्यापार, आर्थिक आघाडीवर मकर संक्रांतीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींवर कसा प्रभाव राहील? तुमची रास कोणती? जाणून घेऊया...

मेष: हा आठवडा सामान्य राहील. आरोग्याच्या आघाडीवर परिस्थिती काहीशी कमकुवत राहण्याची शक्यता असल्याने प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. आर्थिक स्थिती मात्र उत्तम राहील. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतील, जे भविष्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतील. प्रेमसंबंधांमध्ये मात्र काहीसा तणाव जाणवू शकतो; जोडीदारासोबत खटके उडण्याची शक्यता असल्याने संवाद जपून साधा. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचे नाते सांभाळण्याची गरज आहे, अन्यथा मोठ्या वादाला तोंड फुटू शकते. व्यापार करणाऱ्यांनी भागीदाराशी जुळवून घेणे हिताचे ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ सुवर्णमय असून पद-प्रतिष्ठेत वाढ होईल आणि पदोन्नतीचे योगही जुळून येतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मानसिक तणावाचा असू शकतो, विशेषतः स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी संयम राखावा.

वृषभ: हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा राहील. आरोग्याच्या बाबतीत काही समस्या उद्भवू शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा भाग्याचा ठरेल, विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. व्यावसायिकांसाठी हा काळ प्रगतीचा असून नवीन उद्योग किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नोकरीत असलेल्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या ओळखीचा आणि चांगल्या संबंधांचा मोठा फायदा मिळेल. प्रेमसंबंधात मनातील भावना जोडीदारासमोर मोकळेपणाने मांडाल आणि त्यांचेही म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. गृहस्थ जीवनात काही प्रमाणात तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे वागण्या-बोलण्यात सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून विचलित होऊ शकते, त्यामुळे एकाग्रतेवर भर द्यावा लागेल.

मिथुन: हा आठवडा काहीसा आव्हानात्मक असू शकतो. आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम करणे फायदेशीर ठरेल. व्यापारी वर्गासाठी हा काळ मात्र अत्यंत लाभदायक असून व्यवसायात मोठा नफा मिळण्याचे संकेत आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी परिस्थिती अनुकूल राहील आणि पगारवाढीची (इन्क्रिमेंट) आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा काळ थोडा कमकुवत आहे; प्रिय व्यक्तीसोबत एखाद्या विषयावरून बाचाबाची होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन मात्र सुखकर असेल आणि जोडीदाराची साथ लाभेल. आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी नवीन ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विचलित करणारा ठरेल, अभ्यासात मन न लागल्याने शैक्षणिक उद्दिष्टे गाठण्यात अडचणी येऊ शकतात.

कर्क: हा आठवडा संमिश्र फले देणारा असेल. प्रकृतीचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. व्यवसायातून चांगला नफा मिळण्याचे योग आहेत. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना पार्टनरशी असलेल्या मतभेदांमुळे काही समस्या जाणवू शकतात. नोकरीत कामाचे योग्य कौतुक न झाल्याने किंवा सन्मानात कमतरता भासल्याने मन काहीसे अस्वस्थ राहू शकते. प्रेमसंबंधांच्या बाबतीत काळ सामान्य असून जोडीदारासोबत प्रवासाचा बेत आखू शकता. वैवाहिक जीवनात तणाव संभवतो, विशेषतः सासरच्या मंडळींशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांसाठी हा काळ कष्टाचा असला तरी, त्यांनी केलेल्या मेहनतीचे योग्य फळ त्यांना नक्कीच मिळेल.

सिंह: हा आठवडा अतिशय शुभ आणि फलदायी ठरेल. उत्साही राहाल. व्यापारात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीचे प्रबळ योग आहेत. आर्थिक ओघ सतत सुरू राहिल्याने परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जुन्या गुंतवणुकीतून या काळात लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात रोमांस वाढेल आणि प्रिय व्यक्तीसाठी अधिक वेळ द्याल. व्यवसायाची भरभराट होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सामान्य असला तरी, आयटी, मेकॅनिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा आणि यशाचा ठरेल.

कन्या: हा आठवडा काहीसा नरम-गरम राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; योग्य आहार आणि नियमित व्यायाम यावर भर द्यावा. व्यावसायिकांसाठी हा काळ कामाचा व्याप वाढवणारा असेल, नवीन ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि सदस्यांमध्ये एकोपा दिसून येईल. आर्थिक बाबतीत चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो; उत्पन्न सुरू राहील, तरीही दैनंदिन खर्च वाढल्याने बजेट कोलमडू शकते. प्रेमसंबंधात गुप्तता पाळण्याचा प्रयत्न असेल. कुटुंबातील सदस्यांबद्दलचा ओलावा वाढेल आणि जोडीदारासोबत बाहेर फिरायला गेल्याने नात्यात अधिक गोडवा येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात निष्काळजीपणा टाळणे आवश्यक आहे, अन्यथा शैक्षणिक नुकसान होऊ शकते. उच्च शिक्षण घेणाऱ्या जातकांना अधिक परिश्रम आणि एकाग्रतेची गरज आहे.

तूळ: हा आठवडा सामान्य राहील. आरोग्याबाबत गाफील राहू नका. कुटुंबातील काही अपरिहार्य गोष्टींवर अचानक मोठा खर्च करावा लागल्याने आर्थिक ताण येऊ शकतो. व्यापाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने व्यवसाय चालवणे आवश्यक आहे; विशेषतः भागीदारीत वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला असून कामात तुमचे मन लागेल, ज्यामुळे कौटुंबिक सुख-शांतीही टिकून राहील. प्रेमसंबंध टिकवून ठेवण्यासाठी अनावश्यक वाद टाळा, अन्यथा नाते बिघडू शकते. वैवाहिक जीवनात गृहक्लेश किंवा मानसिक तणाव निर्माण झाल्याने घरात अशांतीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थी अभ्यासात एकाग्र होण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतील. चुकीच्या संगतीपासून दूर राहणे हिताचे ठरेल.

वृश्चिक: हा आठवडा सामान्य राहील. प्रकृतीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कौटुंबिक गरजांवर मोठा खर्च होण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजन कोलमडू नये म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यापाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ असून त्यांच्या सर्व योजना यशस्वी होतील. मोठा आर्थिक लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांनी कार्यालयातील राजकारणापासून दूर राहून केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे. प्रेमसंबंधांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. वैवाहिक जीवन सुखाचे असेल आणि जोडीदारासोबत आनंदात वेळ व्यतीत होईल. विद्यार्थ्यांचा कल अभ्यासासोबतच कला, क्रीडा यांसारख्या अवांतर गोष्टींकडे अधिक राहील.

धनु: हा आठवडा संघर्षाचा असू शकतो. आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आर्थिक स्थिती स्थिर असली तरी धनप्राप्तीसाठी अधिक कष्ट करावे लागतील. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चढ-उतारांचा राहील. नोकरीत असमाधान वाटल्याने नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. वैयक्तिक संबंधांमध्ये प्रिय व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक नात्यातही दुरावा येण्याची शक्यता आहे. वैवाहिक संबंध सुधारण्याचे प्रयत्न या काळात फारसे यशस्वी होताना दिसणार नाहीत. विद्यार्थ्यांसाठी हा काळ कठीण असून अभ्यासातून मन भरकटण्याची दाट शक्यता आहे. चुकीच्या गोष्टींकडे ओढ वाढू शकते, तसेच भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता असल्याने संयम ठेवा.

मकर: हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल. आरोग्याबाबत सावध राहा. नियमित व्यायाम करा. व्यापाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल आणि व्यवसायाचा विस्तार होईल, मात्र नोकरी करणाऱ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. कामात मन न लागल्याने अस्वस्थता जाणवेल. आर्थिक बाबतीत कुटुंबातील सदस्यांच्या किंवा भावंडांच्या मागण्या पूर्ण करताना बराचसा पैसा खर्च होऊ शकतो, ज्यामुळे चिडचिड होईल. प्रेमसंबंधात मनातील सुप्त भावना जोडीदारासमोर व्यक्त कराल, ज्याचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराशी संवाद साधल्याने मन हलके होईल आणि समस्या सुटण्यास मदत होईल. पालकांचा सल्ला या काळात मोलाचा ठरेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम असून अभ्यासात चांगली प्रगती होईल.

कुंभ: हा आठवडा बरा राहील. आरोग्यात सुधारणा होईल. व्यावसायिकांना नवीन संधी प्राप्त होतील, ज्यामुळे व्यापारात वाढ होईल. आर्थिक स्थिती मध्यम राहील; किरकोळ खर्च चालू राहतील. खाजगी संबंधांच्या बाबतीत काळ थोडा कठीण असून जोडीदारासोबतचे संबंध बिघडू शकतात. कुटुंबातही एखाद्या कारणावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात शांतता राखण्यासाठी संयम ठेवावा लागेल. विद्यार्थ्यांवर या आठवड्यात जबाबदाऱ्यांचा बोजा अधिक असेल, ज्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकते. घरात गृहक्लेश होण्याची शक्यता असल्याने वादाच्या प्रसंगांपासून दूर राहणेच आपल्या हिताचे ठरेल.

मीन: हा आठवडा उत्साहाचा आणि प्रगतीचा असेल. आरोग्याची स्थिती उत्तम राहील. तेलकट आणि बाहेरील खाद्यपदार्थ टाळणे हिताचे ठरेल. व्यावसायिकांसाठी हा काळ अत्यंत चांगला असून व्यवसायानिमित्त लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मानसिक ताण कमी जाणवेल. वातावरण खेळीमेळीचे राहील. कौटुंबिक संबंध सुधारतील; भावंडांसोबत बाहेर फिरण्याचा बेत आखला जाईल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. मुलांच्या प्रगतीमुळे मन समाधानी राहील. आर्थिक आघाडीवर हा आठवडा भाग्याचा असून उत्पन्नाचे स्रोत वाढतील, ज्यामुळे बचतही वाढेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. मात्र आठवड्याच्या मध्यात थोडा विचलन जाणवू शकते. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळण्याचे शुभ संकेत आहेत.
















