वास्तुशास्त्र सांगते, दैनंदिन जीवनातील 'या' चुका दारिद्रयाला कारणीभूत ठरू शकतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 03:06 PM2022-02-02T15:06:02+5:302022-02-02T15:10:31+5:30

वास्तू तथास्तु म्हणते, हे आपल्यासर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे घरात वाद विवाद, नकारात्मक संभाषण, रडणे टाळले पाहिजे, असा सल्ला आपले वरिष्ठ देतात. घर म्हटल्यावर सुख दुःखाचे प्रसंग, वादावाद तर होणारच, परंतु ते टोकाचे होऊ नयेत, हीच अपेक्षा. त्याचबरोबर आपण आपल्या वास्तूचे पावित्र्य जपले पाहिजे. नकळतपणे हातून घडणारे व्यवहार वास्तू दोष निर्माण करू शकतात. यासाठी स्थळ काळाचे भान ठेवावे आणि पुढे दिलेल्या चुका आवर्जून टाळण्याचा प्रयत्न करावा.

वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवू नये. कारण असे केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. तसेच आर्थिक समस्या भेडसावतात. यामागील तर्काचा विचार केला तर लक्षात येईल, पलंग ही आरामाची, झोपेची जागा आहे. आपल्या पायाची माती चादरीला लागते आणि त्याच ठिकाणी बसून जेवल्याने तेथील जीव जंतूंचा संसर्ग आहाराशी होऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि त्या दूर करण्यासाठी आर्थिक हानी होते. यासाठी जमिनीवर पाट मांडून जेवायला बसणे केव्हाही इष्ट! खाली बसणे शक्य नसेल तर टेबल खुर्चीचा वापर करावा, परंतु पलंगावर बसून जेवू नये.

वास्तुशास्त्रानुसार उष्टी खरकटी भांडी रात्रभर ठेवू नये. त्यामुळे रोगराई वाढते आणि आर्थिक भार देखील वाढतो. स्वाभाविक आहे, असतील शिते तर जमतील भुते या म्हणीनुसार भुते म्हणजे जीव जंतू, जे उष्ट खाण्यासाठी गोळा होतात आणि रोगराई, आजार पसरवतात. म्हणून खरकटी भांडी ठेवू नये असे म्हणतात. परंतु आजच्या धावपळीच्या काळात सर्वांनाच तसे करणे शक्य होईलच असे नाही, त्यावर उपाय म्हणून ताटातील उष्टे-खरकटे गोळा करून टाकून यावे. भांड्यांमध्ये पाणी टाकून ठेवावे, म्हणजे समस्या उद्भवणार नाहीत!

पूर्वीच्या काळी रोज ताजे पाणी भरले जाई. शिळे पाणी ओतून टाकले जाई. अर्थात तेव्हा घरोघरी पाण्याचा विपुल साठा करण्याची सोय नव्हती. त्यामुळे थोडे बहुत पाणी ओतून टाकणे किंवा भांड्यांसाठी वापरणे चालून जात असे. आताच्या काळात पाणी फेकणे कोणालाही परवडणारे नाही आणि ते कोणी फेफुही नाही. मात्र वेळोवेळी पाणी साठवण्याची भांडी स्वच्छ करावीत. त्यामुळे वास्तुदोष तसेच शारीरिक समस्या निर्माण होणार नाहीत.

वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर दही, दूध आणि मीठ कोणालाही दान म्हणून देऊ नये. या तीनही गोष्टी सुबत्तेचे लक्षण आहे. ज्याप्रमाणे आपण सायंकाळी आर्थिक व्यवहार टाळतो, त्याचप्रमाणे दही, दूध, मीठ दान देऊ नये. आर्थिक स्थिती खालावते.

घराच्या ईशान्य दिशेला देवघर बांधणे शुभ असते. याशिवाय ईशान्य दिशेच्या बाजूने पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्या कलशात सकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि घरात सकारात्मक लहरींचा शिरकाव होतो.

केरसुणी उभी ठेवावी. आडवी ठेवू नये. ती ओलांडून जाण्याची शक्यता असते. केरसुणीला आपण लक्ष्मी मानतो, तिची पूजा करतो, पाय लागताच नमस्कार करतो. अशी केरसुणी कायम घराच्या कोपऱ्यात उभी ठेवावी.

घरात पसारा प्रत्येकाकडे असतो. पण अडगळ असता कामा नये. पसारा आवरता येतो, अडगळ वाढत जाते. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा बळावते आणि घरात दारिद्रय शिरकाव करते.