Diwali 2021 : जुने दिवे, पणत्या, समई यांना नवीन लकाकी देण्यासाठी 'या' टिप्सचा नक्की उपयोग करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 03:43 PM2021-10-29T15:43:40+5:302021-10-29T15:47:19+5:30

Diwali 2021 : घरोघरी दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असेल, यात वाद नाही. परंतु पूर्ण घराची स्वच्छता मोहीम पूर्ण होऊनही देवाची उपकरणी आणि जुन्या दिव्यांना उजळणी राहून तर गेली नाही ना? साहजिकच आहे. समई, निरांजन, पणतीवर जमलेली काजळी आणि तेला-तुपाची चढलेली पुटं पाहून ते स्वच्छ करण्याआधीच आपला उत्साह मावळतो. पूर्वी आपल्या आई, आजी चिंचेचा कोळ घेऊन देवाची उपकरणी स्वच्छ करत असत. मात्र अलीकडे त्यासाठी पावडर, लिक्विड सोप बाजारात उपलब्ध आहेत. परंतु त्यांचा वापर करून दिव्यांना चकाकी आणता येईल, मात्र तेलकट-तुपकट दिव्यांची स्वच्छता करणे ही प्राथमिक पायरी टाळता येणार नाही. त्यासाठी कमी कष्टात दिवे स्वच्छ करण्याच्या काही टिप्स आवर्जून वापरून पहा.

चांदीचे दिवे किंवा मूर्ती उजळण्यासाठी बाजारात एक महागडे लिक्विड मिळते. त्याचा वापर सोपा आहेच, पण त्याहीपेक्षा सोपा उपाय आपल्या घरात आहे, तो म्हणजे दात घासण्यासाठी वापरतो ती टूथपेस्ट किंवा पांढरी टूथ पावडर. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही पावडर वापरून तुम्ही चांदीच्या काळवंडलेल्या कोणत्याही वस्तूंना नवीन झळाळी देऊ शकता. प्रश्न राहिला चांदीची समई किंवा निरंजनाचा? तर त्यावरही हा प्रयोग यशस्वी होतो. फक्त त्याआधी साध्या डिश वॉश लिक्विड सोप ने निरांजन, समई धुवून घ्यावी त्यामुळे त्याचा तेलकट-तुपकटपणा निघून जाईल व नंतर त्यावर पेस्ट किंवा पावडरचा वापर केल्यामुळे ते दिवे चकचकीत होतील.

तांब्याचे दिवे, समई स्वच्छ करण्यासाठी अर्धी वाटी कणिक (गव्हाचे पीठ), चार चमचे मीठ आणि व्हिनेगर एकत्र करून ती पेस्ट दिव्यांवर किंवा तांब्याच्या मूर्तीवर व्यवस्थित लावून घ्या. साधारण पंधरा मिनिटे दिवे त्याच स्थितीत ठेवा. नंतर एक ब्रश घेऊन पेस्ट लावलेले दिवे नीट घासून घ्या. दुसऱ्या भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात दिवे ठेवा आणि दहा मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने दिवे धुवून घ्या. कितीही काळे पडलेले दिवे असोत, ते लखलखणारच!

अनेक घरांमध्ये पितळी निरांजन, समई असते. ती स्वच्छ केल्यावर सोन्यासारखी लखाकते. परंतु त्यावर काजळी चढली आणि तेला तुपाची पुटं चढली की ती स्वच्छ करणे जिकिरीचे होऊन बसते. यावर सोपा उपाय म्हणजे एक मोठे पातेले घ्या. त्यात दिवे बुडतील एवढे पाणी घ्या. त्यात दोन चमचे साबणाची पावडर आणि दोन चमचे खाण्याचा सोडा घाला. वरून अर्धा लिंबू पिळून घ्या. पंधरा मिनिटे ते पातेले गॅसवर ठेवून पाणी चांगले उकळू द्या. पंधरा मिनिटानंतर पाण्याच्या वर तेला-तुपाचा थर आणि काजळी जमा झालेली दिसेल आणि त्या काळ्या पाण्याच्या आत स्वच्छ झालेले 'ऑइल फ्री' दिवे दिसतील. गॅस बंद करून दिवे बाहेर काढून चांगल्या पाण्याने धुवून घ्या. त्यांना चकाकी यावी म्हणून बाजारात मिळणारी दिवे स्वच्छ करण्याची पावडर लावून घ्या. साध्या पाण्याने धुवून पुसून घ्या. हे दिवे बाजारातून खरेदी केलेल्या नव्या दिव्यांसारखे लखाकतील.

दिवाळीनंतर वातीसकट तशाच ठेवून दिलेल्या पणत्या काळवंडून जातात. दीप अमावस्येला ते दिवेही लावणार असाल, तर सर्व पणत्यांमधील वाती काढून घ्या. एक पातेले घेऊन त्यात पणत्या बुडतील एवढे गरम पाणी घ्या. त्या पाण्यात डिश वॉश लिक्विड सोप दोन चमचे घाला आणि सर्व पणत्या त्यात बुडवून ठेवा. हे पाणी उकळवायचे नाही हे ध्यानात ठेवा. पंधरा ते वीस मिनिटांमध्ये गरम पाण्यामुळे पणतीचा तेलकटपणा निघून जाईल. त्यांनंतर पणत्या बाहेर काढून घ्या. लिक्विड सोपमध्ये स्पंज बुडवून त्याने पणत्या स्वच्छ करून साध्या पाण्याने धुवून घ्या. या पद्धतीने मातीच्या पणत्या स्वच्छ करणे अगदीच सोपे होईल.