अद्भूत योगात गुरुपौर्णिमा: ९ राशींना गुरुबळ, उधारी परत मिळेल; पद-पगार वाढ, यश-प्रगती अपार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 14:37 IST2024-07-19T14:27:03+5:302024-07-19T14:37:36+5:30
गुरुपौर्णिमेला आठ विविध प्रकारचे शुभ योग जुळून येत आहेत. या योगात केलेले गुरुपूजन पुण्य फलदायी मानले गेले आहे. कोणत्या भाग्यवान राशींना उत्तम लाभ प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या...

चातुर्मासातील पहिला मोठा सण म्हणून गुरुपौर्णिमेकडे पाहिले जाते. आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. व्यास हे सर्व गुरुंचे गुरु. परमगुरुंचे परमगुरु. व्यासांनी आपल्याला म्हणजे आपल्या भारतवर्षाला, आपल्या भारतीय संस्कृतीला खूप काही दिले आहे. महर्षी व्यासांनी या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला, अशी लोकमान्यता प्रचलित आहे. तसेच व्यासांचे स्मरण करण्यासाठी व्यास पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी आपल्या मातापित्यांची आणि गुरूंची पूजा करण्याची प्रथा आहे.

रविवार, २१ जुलै २०२४ रोजी आषाढ गुरुपौर्णिमा आहे. या दिवसापासून संन्यासिजनांचा चातुर्मासारंभ होतो. निष्ठावान शिष्य आणि आदर्श गुरु ह्यांचे परस्परांशी असलेले नाते अन्य मंडळींना कळणारे नसते. शिष्याला आपला गुरु हा देवाहूनही श्रेष्ठ असतो. तर शिष्याला भवसागरातून पैलपार नेण्याची शक्ती केवळ गुरुपाशीच असते. या दिवशी गुरु पूजन केले जाते आणि त्याला अध्याधिक महत्त्व असते. गुरुबद्दल बोलावे, सांगावे तेवढे कमीच पडते.

ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी अनेकविध अद्भूत शुभ योग जुळून आल्याचे सांगितले जात आहे. पहाटे ५.५७ वाजल्यापासून सर्वार्थ सिद्धी योग तयार होत असून, तो दिवसभर राहणार आहे. याशिवाय उत्तराषाढा नक्षत्र पहाटेपासून मध्यरात्री १२.१४ पर्यंत राहील. प्रीती योग आणि विषकुंभ योग तयार होत आहेत. सूर्य आणि शुक्र कर्क राशीत शुक्रादित्य योग तयार होत आहे. मंगळ आणि गुरू वृषभ राशीत असतील. यामुळे कुबेर योग जुळून येत आहे. राहु मीन राशीत, केतू कन्या राशीत, तर शनि मूळ त्रिकोण कुंभ राशीत असल्यामुळे शश राजयोग तयार होत आहे. बुध सिंह राशीत आणि चंद्र मकर राशीत असेल. सूर्य आणि शनि षडाष्टक योग तयार करत आहेत. गुरुपौर्णिमा आणि त्या दिवशीच्या शुभ योगांचा कोणत्या राशींना सर्वाधिक आणि सर्वोत्तम लाभ मिळू शकेल? ते जाणून घेऊया...

मेष: गुरुचा विशेष आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे. योग्य प्रयत्नांमुळे पैशाचा ओघ वाढू शकतो. आर्थिक चणचण दूर होण्याची शक्यता आहे. काम अव्याहत, अखंडितपणे सुरू ठेवावे. नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते. व्यापाऱ्यांच्या व्यवसायात विस्तार होऊ शकतो. रखडलेली व्यावसायिक कामे पूर्ण होऊन नफा वाढू शकतो. जीवनातील भौतिक सुखसोयी वाढू शकतील. कौटुंबिक सहकार्य वाढेल.

वृषभ: गुरु पौर्णिमेचा दिवस चांगला जाऊ शकेल. पालकांसोबत चांगला वेळ घालवू शकतील. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. नोकरदारांना चांगले दिवस येऊ शकतील. अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. नवीन मालमत्ता किंवा वाहन घेण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. जीवनात समाधानी असू शकाल. वैवाहिक जीवनही चांगले जाऊ शकेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

कर्क: गुरु आणि गुरु ग्रहाचे आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग समोर येऊ शकतील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकेल. कामात प्रगतीमुळे नोकरदारांवर बॉस खूश राहतील. व्यावसायिक कामात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहू शकेल.

सिंह: प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक प्रकल्प किंवा सौदे मिळवू शकता. समाजात मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये बरेच फायदे मिळू शकतात. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. कामाचे कौतुक होऊ शकेल. व्यवसायात भरपूर फायदा होणार आहे. गुंतवणूक आता चांगला परतावा देऊ शकेल. जोडीदारासोबत वेळ चांगला जाऊ शकेल. अध्यात्माकडे अधिक कल असेल.

तूळ: काळ खूप अनुकूल आहे. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या योजनेवर भर देऊ शकता. विशेष नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांची प्रलंबित कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी मिळू शकेल. खाजगी नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नवीन कार खरेदी करू शकता. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल.

वृश्चिक: मनोरंजनाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आवडीच्या कंपनीत नोकरी मिळण्याची संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना येत्या काही दिवसांत त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. देवी-देवतांच्या आशीर्वादाने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

धनु: विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. ग्रहांची स्थिती मजबूत असल्यामुळे नोकरदारांना आवडीच्या कंपनीत नोकरी मिळू शकते. व्यावसायिकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.

मकर: विवाहितांसाठी आगामी काळ रोमँटिक ठरू शकेल. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. व्यावसायिकांना दिलासा मिळणाऱ्या घटना घडू शकतात. नवीन प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात.

कुंभ: गुंतवणुकीतून आता चांगला परतावा मिळू शकेल. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. वरिष्ठ अधिकारी कामाचे कौतुक करू शकतील. अशा परिस्थितीत काही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात करू शकता. मानसिक तणावातून दिलासा मिळू शकेल. आरोग्य चांगले राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

















