सौरऊर्जेवर चालणारी देशातील पहिली EV कार लॉन्च, किंमत फक्त ₹3.25 लाख...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 19:39 IST2025-01-18T19:12:03+5:302025-01-18T19:39:31+5:30

Vayve Eva Sola Car: पुण्यातील स्टार्ट-अप कंपनीने ही अनोखी कार लॉन्च केली आहे. जाणून घ्या कारचे संपूर्ण फिचर्स...

Vayve Eva Solar Electric Car launched: राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो (BMGE 2025) चा आज दुसरा दिवस असून, गेल्या दोन दिवसांत एकापेक्षा एक दमदार, आकर्षक आणि नाविण्यपूर्ण अशा गाड्यांचे प्रदर्शन झाले आहे. दरम्यान, या एक्स्पोत पुण्यातील इलेक्ट्रिक वाहन स्टार्ट-अप कंपनी वायवे मोबिलिटीने आज अधिकृतपणे देशातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार 'Vayve Eva' विक्रीसाठी लॉन्च केली आहे. या अनोख्या इलेक्ट्रिक कारची किंमत फक्त 3.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

गेल्या ऑटो एक्स्पोमध्ये या इलेक्ट्रिक कारचे प्रोटोटाइप मॉडेल जगासमोर सादर करण्यात आले होते. मात्र, कंपनीने या कारमध्ये आधीच्या मॉडेलच्या तुलनेत बरेच बदल केले आहेत. याची रुंदी वाढवण्यात आली असून, मागील टायरचे पोझीशनही बदलण्यात आले आहे. यामुळे केबिनची जागाही थोडी मोठी झाली आहे. ही देशातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक कार असल्याचा दावा स्टार्ट-अपने केला आहे. ही कार शहरी भागातील दैनंदिन प्रवास लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. म्हणजेच, शहरात किंवा शहराजवळ फिरण्यासाठी ही एक उत्तम पर्याय ठरू शकते.

व्हेरिएंट्स अन् किंमत: (एक्स-शोरूम)- Nova 3.25 लाख रुपये, Stella 3.99 लाख रुपये, Vega 4.49 लाख रुपये

लुक आणि डिझाईन: या अनोख्या कारचे डिझाइन आगळेगेगळे आहे. Vayve EVA मध्ये समोर ड्रायव्हरसाठी एकच सीट देण्यात आले आहे. मागची सीट थोडी रुंद असून, त्यावर एक प्रौढ आणि एक लहान मूल बसू शकतात. ही ड्रायव्हिंग सीट 6-वे ॲडजस्टेबल आहे. याशिवाय कारमध्ये पॅनोरॅमिक सनरुफदेखील दिला आहे.

कारचा आकार: कारची लांबी 3060 मिमी, रुंदी 1150 मिमी, उंची 1590 मिमी आणि ग्राउंड क्लिअरन्स 170 मिमी आहे. यात पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकांमध्ये ड्रम ब्रेक आहेत. इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंगने सुसज्ज असलेल्या या कारची टर्निंग रेडियस 3.9 मीटर आहे. या रियर व्हील ड्राईव्ह कारचा टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रति तास आहे.

कारचे इंटीरियर: छोटी कार असूनही तिच्या आतील भागात चांगली जागा देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला आहे. यात एअर कंडिशन (एसी) सोबत अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी सिस्टम मिळेल. कारचे पॅनोरामिक सनरूफ इंटीरियरला अधिक प्रशस्त लुक देते.

ड्रायव्हिंग रेंज: ही प्लगइन इलेक्ट्रिक कार असून, यात 14Kwh क्षमतेची (Li-iOn) बॅटरी पॅक देण्यात आले आहे. यामध्ये लिक्विड कूल्ड इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे, जी 12kW पॉवर आणि 40Nm टॉर्क जनरेट करते. सिंगल स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सने सुसज्ज असलेल्या या कारमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम वापरली आहे, ज्यामुळे बॅटरीची शक्ती किंचित वाढते. कंपनीचा दावा आहे की, ही कार एका चार्जवर 250 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. यामध्ये दिलेले सोलर पॅनल कारच्या सनरूफच्या जागी बसवले आहे.

चार्जिंग: ही कार शहरातील छोट्या राइड्ससाठी तयार करण्यात आली आहे. या कारचे एकूण वजन 800 किलो असून, ती जास्तीत जास्त 250 किलोपर्यंत वजन उचलण्यास सक्षम आहे. कारची बॅटरी सामान्य घरगुती (15A) सॉकेटमधून सहजपणे चार्ज केली जाऊ शकते. बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी अंदाजे 4 तास लागतात, तर DC फास्ट चार्जर (CCS2) वरून पूर्ण चार्ज होण्यासाठी फक्त 45 मिनिटे लागतात. याशिवाय, सोलार पॅनलद्वारेही बॅटरी चार्ज होऊ शकते. कंपनीच्या दाव्यानुसार, सौरउर्जेवर चार्ज झालेल्या बॅटरीमुळे दरवर्षी अतिरिक्त 3 हजार किमी किंवा दररोज 10 किमीची रेंज मिळेल.