नव्या गाड्या घ्या, 60 रुपये लीटरने इंधन देतो; देशवासियांना नितीन गडकरींची अजब 'ऑफर'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 05:27 PM2021-02-07T17:27:07+5:302021-02-07T17:32:23+5:30

Nitin Gadkari News: महाराष्ट्रातील देशपातळीवर पोहोचलेले स्पष्टवक्ते राजकारणी आणि भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन यांनी देशातील वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या प्रश्नावर मोठी घोषणा केली आहे.

महाराष्ट्रातील देशपातळीवर पोहोचलेले स्पष्टवक्ते राजकारणी आणि भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन यांनी देशातील वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या प्रश्नावर मोठी घोषणा केली आहे. तुम्ही नव्य़ा गाड्या घ्या, मी 60 रुपयाने लीटर इंधन देतो, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आज मुंबईत पेट्रोल 93.49 रुपये लीटर आणि डिझेल 83.99 रुपये लीटर आहे. तर सर्वात स्वस्त पर्याय असलेला सीएनजी 47.90 रुपये प्रति किलो आहे. पेट्रोल, डिझेलचे वाढते दर पाहून सर्वसामान्यांना घाम फुटू लागला आहे.

पेट्रोल लवकरच 100 रुपये आणि डिझेल 90 रुपये पार करण्याची भीती अनेकजण वर्तवू लागले आहेत. यातच विरोधी पक्षांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. भाजपानेही राज्य सरकारविरोधात कर कमी करण्यासाठी आंदोलन केले.

दरम्यान, केंद्रीय़ मंत्री नितीन गडकरी यांना वर्ध्यामध्ये पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. यामध्ये गडकरींनी स्पष्टपणे आमचे सरकार नसताना आम्ही विरोधक होतो, तेव्हा आम्ही आंदोलन करत होतो. आता आमचे सरकार आहे तर कसे आंदोलन करणार. आता आंदोलन न करता आम्ही पेट्रोल, डिझेलला पर्याय शोधतोय, असे स्पष्टपणे सांगितले.

देशभरातील ज्या गाड्या आहेत त्यामध्ये तुम्ही टाकत असलेल्या इंधनात आम्हीच तयार केलेले 10 टक्के इथेनॉल मिक्स केले आहे. विरोधी पक्षाचे तेव्हा आम्ही काम करत होतो.

आता आम्ही अशी टेक्नॉलॉजी आणू की तुम्हाला 95 रुपयांनी पेट्रोल टाकण्याऐवजी 60 रुपयांत लीटर इथेनॉल मिळेल. त्याचे पंप पुढील दोन तीन महिन्यांत सुरु करू, त्यामुळे तुम्हाला स्वस्तात इंधन मिळेल, असेही गडकरींना सांगितले.

टीव्हीएस, बजाजने 100 टक्के इथेनॉलवर चालू शकणाऱ्या स्कूटर आणल्या आहेत. तसेच टोयोटा, मर्सिडीज, होंडा, बीएमडब्ल्यू मध्ये फ्लेक्स इंजिनच्या गाड्या आणल्या आहेत. त्या गाड्या 100 टक्के पेट्रोल आणि 100 टक्के इथेनॉलवरही चालू शकतात.

टेक्नॉलॉजीच्या आधारे आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्ही येणाऱ्या काळात फ्लेक्स इंजिनच्या गाड्या, इथेनॉलच्या गाड्या घ्या, म्हणजे तुम्हाला 60 रुपयांत इंधन मिळेल, असा सल्ला गडकरी यांनी देऊन टाकला.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ होत आहे. मुंबईत 23 मार्च 2020 ला पेट्रोल 75.30 रुपयांवर होते. दहा महिन्यांनी आजचा विचार केला तर 18.29 रुपयांची वाढ झाली आहे.

तर 24 मार्च 2020 ला डिझेल 65.21 रुपयांना होते. लॉकडाऊननंतरच्या 10 महिन्यांचा विचार केल्यास आजच्या डिझेलच्या किंमतीत 18.78 रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच मुंबईच्या दरांनुसार पेट्रोलपेक्षा डिझेलचेच दर जास्त वाढले आहेत.