पेट्रोल, डिझेल, सीएनजी की इलेक्ट्रीक? कोणती कार तुमच्यासाठी परफेक्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 12:32 PM2023-03-24T12:32:37+5:302023-03-24T12:39:14+5:30

इलेक्ट्रीक कार आणि पेट्रोल-डिझेलच्या कारमध्ये आता फारसा फरक राहिलेला नाहीय. फक्त एकदम एवढे पैसे जास्त दिसत असल्याने लोक हिचकिचत आहेत.

भारतात गेल्या अनेक वर्षांपासून पेट्रोल, डिझेलच्या कारचा खप सर्वाधिक होता. हळूहळू एलपीजीवीरल कार आल्या. नंतर त्यांची जागा सीएनजीवरच्या कारनी घेतली. तरी देखील लोक पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या कार घेत होते. परंतू, दोन-तीन वर्षांपूर्वी पेट्रोल, डिझेलच्या किंमती दुप्पटीने वाढल्या आणि इलेक्ट्रीक कारची एन्ट्री झाली आणि सगळी समिकरणेच बदलून गेली.

इलेक्ट्रीक कार आणि पेट्रोल-डिझेलच्या कारमध्ये आता फारसा फरक राहिलेला नाहीय. फक्त एकदम एवढे पैसे जास्त दिसत असल्याने लोक हिचकिचत आहेत. यामुळे या वाढलेल्या इंधन दरात सीएनजीला लोक जास्त भाव देत आहेत. यामुळे कंपन्या सीएनजीची मॉडेल काढू लागली आहेत. मग कोणती कार घ्यावी या पेचात लोक आहेत.

पेट्रोलची महाराष्ट्रातील किंमत १०६ रुपये आहे. यामुळे सध्या तुमचा आठवड्यातून एकदाच प्रवास असेल किंवा फार कमी वापर असेल तर तुम्हाला पेट्रोल कार परडणार आहे. मात्र, जास्त रनिंग असेल आणि डिझेल कारचा पर्याय तुमच्यासमोर नसेल तर तुम्हाला सीएनजी कार घ्यावी लागणार आहे.

सध्या पेट्रोल आणि सीएनजीच्या किंमती सारख्याच असल्या तरी पेट्रोल आणि सीएनजीच्या मायलेजचा विचार करावा. सेलेरिओ २५० किमी, टिगॉर २१५ किमी एका टाकीत कापते. यासाठी साडे पाचशे-सहाशे रुपयांचा सीएनजी लागतो. हेच अंतर पेट्रोल किंवा डिझेलने कारण्याचे ठरविल्यास तुम्हाला १५०० ते २००० रुपये लागू शकतात. यामुळे सध्याच्या काळात पेट्रोल, डिझेलपेक्षा सीएनजी कारच फायद्याची ठरत आहे.

सीएनजीचे काही तोटे आहेत. एक म्हणजे डिक्की जाते. काही कारमध्ये टाटा, मारुतीने सीएनजी टाक्या खाली बसविलेल्या आहेत. यामुळे डिक्की मिळत आहे. परंतू हे दोन-तीन कारमध्येच आहे. अन्य कारमध्ये डिक्की जाते. दुसरी बाब म्हणजे पिकअप कमी होतो. सीएनजी भरण्यासाठी रांगा लावाव्या लागतात.

ज्या लोकांना डोंगररांगा, पिकअप, परफॉर्मन्स हवा आहे त्यांनी डिझेल कारकडे वळावे. ज्या लोकांचे रनिंग जास्त आहे आणि त्यांना सीएनजीचा पर्याय शहराबाहेर मिळत नाही त्यांनी डिझेल कार घ्यावी. रनिंग कमी असेल तर पेट्रोल किंवा सीएनजी कार घ्यावी. कारण डिझेल कारसाठी तुम्ही जी जास्तीची रक्कम मोजणार ती वसूल होणार नाही. हा तोटाच आहे.

इलेक्ट्रीक कारसाठी तुम्हाला १३ लाख रुपयांपासून ते २०-२५ लाखांपर्यंत पैसे मोजावे लागताहेत. यामुळे त्याचा हप्ताच काय तो महाग पडेल. बाकी रनिंग कॉस्ट तुम्हाला काही पैशांत येईल. त्याचा विचार केला तर तुम्हाला पेट्रोल, डिझेलवर होणारा खर्च ईएमआयमध्ये टाकता येईल. म्हणजे घोडं भाडं तेच होईल आणि चार्जिंगसाठी तासंतास थांबावे लागेल.

सध्या इलेक्ट्रीक कार चार्जिंग स्टेशनही पुरेसी नाहीत. यामुळे कुठेतरी तुम्ही अडकू शकता. हा धोका वगळला तर बॅटरीचा खर्च तुम्हाला परवडला पाहिजे. बॅटरी जर वॉरंटीत खराब झाली तर ठीक नाहीतर वॉरंटी संपली आणि खराब झाली तर तुम्ही लुटलात म्हणून समजा.