Marut E-Tract: आता शेतात चालवा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; ८० रुपयांत ६ तास चालणार, किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 05:25 PM2022-11-29T17:25:06+5:302022-11-29T17:27:46+5:30

भारत वेगाने इलेक्ट्रिफाइड होत असून आता ही इलेक्ट्रिफिकेशनची शर्यत रस्त्यापासून थेट शेतापर्यंत पोहचली आहे. रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असतानाच शेतात वापरण्यात येणारी वाहने आणि उपकरणेही मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिफाईड होत आहेत.

रस्त्यावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक रिक्षांपासून प्रेरणा घेत गुजरातच्या शेतकऱ्याने असाच एक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनवला आहे. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला Marut E Tract 3.0 असं नाव देण्यात आलं आहे. गुजरातमधील अहमदाबाद स्थित या कंपनीचे हे पहिले इलेक्ट्रिक वाहन आहे.

ई ट्रॅक्टर तयार होण्यासाठी जवळपास ४ वर्षे लागली अशी माहिती मारूत ई एग्रोटेकचे संचालक निकुंज किशोर कोराट यांनी दिली. निकुंज सांगतात की, ५ वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी दिल्लीच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक रिक्षा धावताना पाहिल्या तेव्हा त्यांना कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये इलेक्ट्रिक मोटर्स आणि बॅटरी वापरण्याची कल्पना सुचली.

या दृष्टीकोनातून निकुज पुढे सरसावले. २०१८ पासून इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे उत्पादन सुरू केले. यादरम्यान त्यांनी चार प्रोटोटाइप तयार केले, सुरुवातीला १ किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये वापरला आणि अनेक आव्हाने पेलल्यानंतर अखेर त्यांना यश मिळाले आणि त्यांनी हे अंतिम उत्पादन बनवले.

निकुंज हा शेतकरी कुटुंबातून आले असून तो मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विकसित करणे हे एक मोठे आव्हान होते, विशेषत: जेव्हा त्याचा थेट मुकाबला सध्याच्या डिझेल ट्रॅक्टरशी आहे. जवळजवळ ९८ टक्के स्थानिक उत्पादनापासून हा ट्रॅक्टर बनवलाय.

या ट्रॅक्टरमधील फक्त कंट्रोलर अमेरिकन कंपनीचा आहे. याशिवाय इतर सर्व पार्ट्स मेड-इन-इंडिया आहेत. साहजिकच, परवडणारे उत्पादन तयार करणे हा त्यामागील त्यांचा उद्देश आहे असं निकुजने एका मुलाखतीत सांगितले आहे.

मारुत ई-ट्रॅक्ट रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमसह 11kWh बॅटरी पॅक वापरते, त्याची इलेक्ट्रिक मोटर 3KW क्षमतेचे पॉवर आउटपुट देते. या स्टार्टअपचा दावा आहे की त्याची बॅटरी घरगुती १५ अँपिअर सॉकेटशी कनेक्ट करून फक्त ४ तासांत पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर हा ट्रॅक्टर ६ ते ८ तास चालू शकतो.

निकुंज सांगतात की, त्यांच्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची बॅटरी चार्ज करण्यासाठी एकूण १० युनिट वीज वापरली जाते आणि सरासरी, कोणत्याही भागात, प्रति युनिट विजेचा दर ८ रुपये जरी ठेवला तरी पूर्ण चार्जसाठी सुमारे ८० रुपये लागतात.

बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर, हा ट्रॅक्टर ८० रुपये खर्चून ६ तास चालेल. त्याच वेळी, डिझेलची किंमत ९० ते ११० रुपये प्रति लीटर आहे आणि सुमारे ६ तास काम करण्यासाठी, ट्रॅक्टरला सुमारे ६ लिटर इंधन लागेल, ज्यासाठी तुम्हाला सुमारे ५०० ते ५५० रुपये खर्च करावा लागेल.

हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे, तो विक्रीसाठी उपलब्ध नाही, परंतु किंमतीबद्दल कंपनीनं सांगितलं की, त्याची किंमत सुमारे ५.५० लाख रुपयांपासून सुरू होईल. याशिवाय इलेक्ट्रिक वाहने आणि कृषी वाहनांवर सरकारने दिलेल्या सवलतींचा समावेश केल्यास त्याची किंमत आणखी कमी होऊ शकते.

त्याचबरोबर या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या बॅटरीवर ३ वर्षे किंवा ३००० तासांची वॉरंटी दिली जात आहे आणि इलेक्ट्रिक मोटरसाठी २००० तासांची वॉरंटी दिली जात आहे. तुम्ही या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची बॅटरी सौर पॅनेलला जोडूनही चार्ज करू शकता.