KYMCO Electric Scooter: एक ना धड भाराभर! आता तैवानच्या क्यामकोची इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; 199 ची रेंज, किंमतही लाखभर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 12:06 PM2022-01-14T12:06:57+5:302022-01-14T12:11:42+5:30

KYMCO Electric Scooter: देशात सध्या इलेक्ट्रीक स्कूटर, मोटरसायकल, बाईकचा पूर आला आहे. यामुळे लोकांचे कन्फ्युजन मात्र वाढू लागले आहे.

देशात सध्या इलेक्ट्रीक स्कूटर, मोटरसायकल, बाईकचा पूर आला आहे. यामुळे लोकांचे कन्फ्युजन मात्र वाढू लागले आहे. पेट्रोलच्या स्कूटरच्या मोजक्याच कंपन्या होत्या. त्यामुळे निवड करणे सोपे होत होते. आता गेल्या वर्षभरातच एवढ्या इलेक्ट्रीक कंपन्या आल्यात की वर्षाचे दिवसही कमी पडतील अशी अवस्था झाली आहे.

अशातच तैवानच्या कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश केला आहे. क्यामको (KYMCO) ने एक परवडणारी इलेक्ट्रीक स्कूटर KYMCO LIKE 125 EV लाँच केली आहे. स्वस्त असण्यासोबतच ही स्कूटर दिसायलाही चांगली आहे. जवळपास २०० किमीची रेंज असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

क्यामको लाईट १२५ ईव्ही ही स्कूटर स्वस्त असण्याबरोबरच वजनाने हलकीदेखील आहे. यामुळे ही स्कूटर चालविणे देखील महिलांना सोपे जाणार आहे. कंपनीची ही ईस्कूटर पेट्रोल स्कूटरपेक्षा वेगळी दिसत नाही, आजकाल या वाहनांपेक्षा वेगळ्या लूकच्या इलेक्ट्रीक स्कूटर काढण्याचा ट्रेंड आहे.

क्यामकोच्या या स्कूटरमध्ये हेडलँप कव्हर, मागच्या बाजुला ग्रॅब हँडल, हेडलाईट बेझल आदीमध्ये बदल करण्यात आले आहेत. सोबतच यामध्ये निळ्या रंगाची फिनिश देण्यात आली आहे.

क्यामकोच्या या स्कूटरचे वजन ११० किलो आहे. कंपनीने ही स्कूटर पांढऱ्या रंगात आणली आहे. बॅटरी लेव्हल, वेगाची माहिती मिळविण्यासाठी स्कूटर अॅपद्वारे फोनशी कनेक्ट करता येते. यामध्ये डिजिटल डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे.

यामध्ये 3.2Kw ची मोटर देण्यात आली आहे. याचा पावर सेटअप 4.3 हॉर्सपावर आणि पाच Ionex बॅटरी ठेवण्यासाठी जागा देते. Ionex हे क्यामकोने संशोधित केलेले बॅटरी तंत्रज्ञान आहे. ही बॅटरी एका तासाच्या आतच फुल चार्ज होते.

क्यामकोची ही इलेक्ट्रीक स्कूटर एकदा फुल चार्ज केली की १९९ किमीपर्यंत चालू शकते. यामध्ये सीटच्या खाली २७ लीटरचे स्टोरेज दिलेले आहे. यामध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि रिअर ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.

कंपनीने ही स्कूटर १२०० युरो म्हणजेच जवळपास १ लाख रुपयांना लाँच केले आहे. या स्कूटरची विक्री युरोप, आशियाई देश आणि मध्य अमेरिकेमध्ये केली जाणार आहे. भारतात ही स्कूटर येण्याची शक्यता आहे.