'या' कंपनीच्या Electric Bikes ची जबरदस्त विक्री; उत्तम रेंज, कमी किंमतीमुळे विक्रीत ४३५ टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 01:19 PM2021-09-02T13:19:45+5:302021-09-02T13:32:25+5:30

Electric Bike Sale Increased : पाहा किती आहे या Electric Bike ची किंमत आणि काय आहे विशेष.

भारतीय बाजारपेठेत गेल्या काही महिन्यांत इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे, लोक इलेक्ट्रीक वाहनांकडे, विशेषत: दुचाकींच्या बाबतीत अधिक आकर्षित होत आहेत.

देशातील आघाडीची इलेक्ट्रीक दुचाकी उत्पादक कंपनी Joy E Bike च्या वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात वाहनांच्या विक्रीत 435 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

जॉय ई बाईक्सनं दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यामध्ये कंपनीनं इलेक्ट्रीक वाहनांच्या 2001 युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात फक्त 374 युनिट्स होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ती 435 टक्क्यांनी अधिक आहे.

एवढेच नाही तर गेल्या जुलैच्या 945 युनिट्सच्या तुलनेत 112 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. कंपनीने आतापर्यंत सर्वाधिक 4,500 युनिट्सची बुकिंगही केलं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

"या आर्थिक वर्षात आमचे लक्ष्य बाजारातील उपस्थिती मजबूत करणं आहे. आमच्या वाहन पोर्टफोलिओची मागणीत चांगली वाढ झाली आहे," अशी माहिती मासिक विक्रीवर भाष्य करताना वार्डविझार्ड इनोव्हेशन अँड मोबिलिटी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यतीन गुप्ते म्हणाले.

याशिवाय बुकिंग आणि चौकशीमध्येही वाढ झाली आहे. आम्हाला गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानसारख्या बाजारपेठांमध्ये जास्तीत जास्त बुकिंग मिळाले असल्याची माहितीही गुप्ते यांनी दिली.

सध्या या कंपनीची सेवा २५ पेक्षा अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे. लवकरच ही संख्या वाढवण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. Joy E Bike च्या वाहन पोर्टफोलिओमध्ये तुफान, थंडरबोल्ट आणि स्कायलाइन सारख्या हाय-स्पीड इलेक्ट्रिक बाइक्सचा समावेश आहे. याचा टॉप स्पीड 90 किमी आहे. याशिवाय कंपनी इलेक्ट्रीक स्कूटरचीही विक्री करते.

कंपनीच्या प्रसिद्ध बाईक जॉय मॉन्स्टर मध्ये कंपनीने 250W क्षमतेची BLDC इलेक्ट्रीक मोटर आणि 72V, 39AH लिथियम बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. ही बाईक जास्तीत जास्त 25 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकते. ही बाईक संपूर्ण चार्ज होण्यासाठी पाच ते साडेपाच तासांचा कालावधी लागतो.

केंद्र आणि राज्य सरकारकडून इलेक्ट्रीक वाहनांना मिळणाऱ्या सबसिडी आणि मिळणारी सूट यामुळे वाहनांची विक्री अनेक पटींनी वाढली असल्याचं मत वाजविझार्ज इनोव्हेशन अँड मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य वित्तीय अधिकारी स्रेहा शौचे यांनी यापूर्वी व्यक्त केलं होतं.