Ford India: Ford इकोस्पोर्ट्सच्या अखेरच्या युनिटनंतर चेन्नईचा प्लांटही बंद, कंपनीचा भारताला अखेरचा ‘अलविदा’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 05:59 PM2022-07-21T17:59:30+5:302022-07-21T18:07:03+5:30

Ford India: फोर्ड इंडियाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतातील आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली होती.

Ford India: भारतीय ऑटो इंडस्ट्रीला सध्या मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतील दिग्गज ऑटो कंपनी फोर्ड मोटरने भारतातील आपला व्यवसाय पूर्णपणे बंद केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी तोट्यात होती, या परिस्थितींवर मात करण्यासाठी फोर्डने अनेक प्रयत्न केले, पण गेल्या वर्षी कंपनीने भारतातील व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली.

या अंतर्गत फोर्डने चेन्नईतील आपला प्लांट बंद केला असून, नुकतेच कंपनीने इकोस्पोर्ट एसयूव्हीचे अखेर युनिट बनवून रवाना केले. कंपनीचे गुजरातमधील सानंद आणि तामिळनाडूमधील चेन्नई येथे दोन प्लांट आहेत. सानंद प्लांटमध्ये फिगो, फ्रीस्टाइल आणि ऍस्पायर सारख्या छोट्या कारचे उत्पादन व्हायचे, तर चेन्नई प्लांटमध्ये फोर्ड इकोस्पोर्ट आणि एंडेव्हर सारख्या एसयूव्हीचे उत्पादन केले जायचे.

कंपनीने यापूर्वीच सानंदच्या प्लांटमध्ये उत्पादन करणे बंद केले होते. त्यानंतर आता त्यांनी चेन्नई प्लांटमध्येही उत्पादन बंद केले आहे. कंपनीने फोर्ड इकोस्पोर्टचे शेवटचे युनिट तयार करुन बाजारात पाठवले. यापुढे या प्लांटमध्ये कारचे उत्पादन होणार नाही. म्हणजेच फोर्डने आता भारतीय बाजारपेठेला कायमचा बाय बाय केला आहे.

फोर्डच्या भारतातील मराईमलाई आणि सानंद येथे सुमारे 4,000 कर्मचारी कार्यरत होते. सानंद येथील इंजिन प्लांटमध्ये 500 हून अधिक कामगार होते. ते सर्वाधिक विक्री होणाऱ्या रेंजर पिकअप ट्रकसाठी इंजिन तयार करायचे. याशिवाय, पार्ट डिलिव्हरी आणि ग्राहक सेवेसाठी सुमारे 100 कर्मचारी कार्यरत होते. तर, कंपनीचे देशभरात 11,000 पेक्षा जास्त कर्मचारी होते.

ऑगस्ट 2021 मध्ये फोर्डने देशभरात 1,508 युनिट्सची विक्री केली, त्यापूर्वीच्या वर्षात 4,731 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच, कंपनीच्या विक्रीत 68.1% ची घट झाली. FADA च्या अहवालानुसार, ऑगस्टमध्ये फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या 3,604 वाहनांची पॅसेंजर वाहन विभागात नोंदणी झाली. पण, त्याचा बाजार हिस्सा केवळ 1.42% होता. ऑगस्ट 2020 मध्ये कंपनीचा बाजार हिस्सा 1.90% होता.

फोर्डने 1995 मध्ये महिंद्रासोबत भागीदारी करून भारतात प्रवेश केला होता. त्यावेळी कंपनीचे नाव महिंद्रा फोर्ड इंडिया लिमिटेड (MFIL) होते. फोर्ड इंडियाने जुलै 2018 मध्ये 1 दशलक्ष (1 दशलक्ष) ग्राहकांचा टप्पा गाठला. त्यानंतर कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा यांनी सर्वांचे आभार मानले होते.

आता चेन्नई प्लांटमधून शेवटचे इकोस्पोर्ट युनिट बाहेर पडल्याने फोर्डचा भारतातील प्रवास संपला आहे. ही भारतातील सब 4 मीटर एसयूव्ही सेगमेंटमधील पहिली कार होती. त्याची संकल्पना 2013 मध्ये दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आली होती. इकोस्पोर्टची भारतात चांगली सुरुवात झाली होती.

कंपनीने भारतातून निघून जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारत सरकारने मदतीचा हात पुढे केला होता. भारत सरकारने प्रोडक्शन-लिंक्ड इंसेटिव्ह (PLI) योजनेद्वारे ऑटोमोबाईल क्षेत्राला प्रोत्साहन दिले होते. फोर्ड प्योअर इलेक्ट्रिक वाहन कंपनी म्हणून परत येईल असा विश्वास होता. वीस कंपन्यांमध्ये फोर्डची निवडही करण्यात आली होती, परंतु कंपनीने नकार दिला.