आता रतन टाटांची कंपनी तयार करणार बॅटरी, पाहा काय आहे TATA समुहाची योजना?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 03:13 PM2022-05-12T15:13:28+5:302022-05-12T15:19:18+5:30

पाहा काय आहे दिग्गज टाटा समुह प्लॅन.

भारतातील टेक ते ऑटो उद्योगापर्यंतच्या व्यवसायात गुंतलेला टाटा समूह भारतात आणि परदेशात बॅटरी कंपनी सुरू करण्याच्या तयारीत आहे. टाटा समूहाचे (Tata group) अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी बुधवारी ही माहिती दिली.

टाटा सध्या इलेक्ट्रीक वाहनांच्या (E-Vehicles) निर्मितीवर भर देत असल्याचं एन चंद्रशेखरन यांनी सांगितलं. टाटा समूह सर्व व्यवसायांचा कायापालट करत आहे. यामध्ये टाटा मोटर्स आणि त्यांचे ब्रिटीश लक्झरी युनिट जग्वार लँड रोव्हर यांचा समावेश असल्याचंही ते म्हणाले.

भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रीक कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) 2025 पर्यंत 10 इलेक्ट्रीक मॉडेल्स लॉन्च करण्याची योजना आखत आहे. तर जॅग्वार लँड रोव्हरचा लक्झरी जॅग्वार ब्रँड 2025 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रीक होईल आणि कंपनी 2030 पर्यंत सर्व ई-मॉडेल्स लाँच करेल.

कंपनी लवकरच शून्य कार्बन उत्सर्जन असलेल्या समुहाच्या दिशेनं एक लक्ष्य जाहीर करणार असल्याचं चंद्रशेखर यांनी सांगितलं. आम्ही आमच्या प्रमुख व्यवसायांना भविष्याच्या दृष्टीनं तयार करण्यासाठी काही बदल करत आहोत. आम्ही व्यवसायात डिजिटल, डेटा आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला एकत्र करत असल्याचंही ते म्हणाले.

टाटा समुहानं जागतिक बाजारपेठांसाठी 5 जी तयार करणं आणि दूरसंचार उपकरणांसाठी एक कंपनी सुरू केली आहे. आता आम्ही देश विदेशात बॅटरी कंपनी लाँच करण्यासाठी एक ब्लूप्रिंन्ट तयार करत आहोत, असंही ते म्हणाले. परंतु त्यांनी यासंदर्भात कोणतीही अधिक माहिती दिली नाही.

भारतात इलेक्ट्रीक कार मार्केटमध्ये टाटा मोटर्सचा बोलबाला आहे. टाटा नेक्सॉन ईव्ही आणि टिगोर ईव्हीचं उत्पादन घेत आहे. 11 मे रोजी टाटा मोटर्सनं Tata Nexon EV Max लॉन्च केली आहे. आतापर्यंत कंपनीनं भारतात एकूण 19 हजार नेक्सॉन ईव्हीची विक्री केल्याची माहिती कंपनीनं दिली आहे.