शाळेला जाता येत नसल्याने विद्यार्थ्यांनी रोखली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:16 IST2021-02-12T04:16:45+5:302021-02-12T04:16:45+5:30

पाथरी : पाथरी-सोनपेठ रस्त्यावरील ८ ते १० गावांमधील विद्यार्थ्यांना पाथरी येथे शाळेत जाण्यासाठी एकच बस उपलब्ध असल्याने व त्यामधून ...

The students stopped the bus as they could not go to school | शाळेला जाता येत नसल्याने विद्यार्थ्यांनी रोखली बस

शाळेला जाता येत नसल्याने विद्यार्थ्यांनी रोखली बस

पाथरी : पाथरी-सोनपेठ रस्त्यावरील ८ ते १० गावांमधील विद्यार्थ्यांना पाथरी येथे शाळेत जाण्यासाठी एकच बस उपलब्ध असल्याने व त्यामधून प्रवास करणे कठीण झाल्याने दुसरी बस सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास या मार्गावरील एक बस विद्यार्थ्यांनी रोखून धरली. एसटी महामंडळाने दुसऱ्या बसची व्यवस्था केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले. अशातच ऑनलाईन शिक्षणाचा म्हणावा त्या प्रमाणात विद्यार्थ्यांना फायदा झाला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे पाय शाळेकडे वळू लागले आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील शाळेत जाण्यासाठी पुरेशा सुविधा नसल्याने अडचणीत भर पडली आहे. पाथरी-सोनपेठ रस्त्यावरील आठ ते दहा गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी पाथरी येथे येतात. त्यांना शाळेत जाण्यासाठी परळी-सिरसाळ-पाथरी ही एकच बस आहे. विटा गावापासून विद्यार्थी या बसने प्रवासाला सुरुवात करतात. त्यानंतर पुढे ही बस फुल्ल होते. त्यामुळे बाभळगाव, लोणी, टाकळगव्हण, समर्थनगरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बसमध्ये बसण्यासाठी जागा राहत नाही. याबाबत वारंवार तक्रार करूनही एसटी महामंडळाने पर्यायी व्यवस्था केली नाही.

११ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांची परीक्षा होती. अशातच एकच बस असल्याने व ती प्रवाशांनी खचाखच भरल्याने समर्थनगर येथील विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळाली नाही. त्यामुळे जवळपास २५ विद्यार्थ्यांनी ही बस रोखून धरली व बससमोर ठिय्या मांडला. याबाबतची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांना मिळाल्यानंतर ते आंदोलनस्थळी दाखल झाले. तेथून त्यांनी आगारप्रमुखांना फोन केला. त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे धर्मे यांनी संताप व्यक्त केला.

वाहतूक नियंत्रकांच्या फोननंतर आली बस

शिवसेनेचे रवींद्र धर्मे यांनी पाथरी आगाराच्या वाहतूक नियंत्रकांना फोन केला व त्यांना विद्यार्थ्यांसाठी तातडीने दुसरी बस पाठवून द्यावी, अशी विनंती केली. तसेच विद्यार्थ्यांची निकड त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर नियंत्रकांनी तातडीने दुसरी बस पाठवून दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले व या बसमध्ये बसून ते पाथरीतील शाळेकडे रवाना झाले. या मार्गावर दुसरी बसही कायम सुरू ठेवावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली.

Web Title: The students stopped the bus as they could not go to school