आधी बारदाण्याअभावी १ महिना हरभरा खरेदी नव्हती, आता पोर्टलच बंद; शेतकऱ्यांत संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 16:38 IST2026-04-25T16:37:05+5:302026-04-25T16:38:40+5:30
नाफेडची हरभरा खरेदी अचानक बंद! केंद्र सरकारने पोर्टल लॉक केल्याने शेतकरी संतप्त

आधी बारदाण्याअभावी १ महिना हरभरा खरेदी नव्हती, आता पोर्टलच बंद; शेतकऱ्यांत संताप
बोरी (परभणी): येथील तुळजाभवानी सहकारी संस्थेमार्फत सुरू असलेले नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र केंद्र सरकारने अचानक पोर्टल बंद केल्याने ठप्प झाले आहे. २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५:३० वाजता अचानक पोर्टल लॉक झाल्यामुळे, ज्या शेतकऱ्यांना माल आणण्यासाठी एसएमएस आले होते, त्यांनाही आता रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला असून, ४१ अंशांच्या कडाक्याच्या उन्हात शेतकरी आपला माल घेऊन केंद्रावर ताटकळत उभे आहेत.
एसएमएस आला, पण माल घेईना!
बोरी केंद्रावर एकूण १७८५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी ९३० शेतकऱ्यांची खरेदी पूर्ण झाली, मात्र ८५५ शेतकऱ्यांचा माल अद्याप घेणे बाकी आहे. विशेष म्हणजे १३० शेतकऱ्यांना माल आणण्याचे एसएमएस आले होते, त्यांनी आपला हरभरा केंद्रावर आणलाही. मात्र, पोर्टल बंद झाल्याने आता या मालाचे मोजमाप करणे अशक्य झाले आहे. खुल्या बाजारात ५००० रुपये दर मिळत असताना नाफेडला ५९०० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठी आशा बाळगली होती.
प्रशासकीय मध्यस्थीची मागणी
यापूर्वी बारदाण्याच्या कमतरतेमुळे जवळपास एक महिना खरेदी बंद होती. त्यामुळे ही मुदत किमान एक महिना वाढवून मिळायला हवी, अशी मागणी शेतकरी बी. जी. गोरे यांनी केली आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी सांगितले की, "केंद्र सरकारचा कोटा पूर्ण झाल्याने पोर्टल बंद झाले आहे, मात्र आम्ही वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करत आहोत."