बोरी सर्वात मोठी तर ढेबेवाडी सर्वात लहान ग्रामपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:09 IST2020-12-28T04:09:50+5:302020-12-28T04:09:50+5:30

परभणी : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली असून, बोरी ही सर्वात मोठी ग्रामपंचायत तर गंगाखेड तालुक्यातील ढेबेवाडी सर्वात ...

Bori is the largest and Dhebewadi is the smallest gram panchayat | बोरी सर्वात मोठी तर ढेबेवाडी सर्वात लहान ग्रामपंचायत

बोरी सर्वात मोठी तर ढेबेवाडी सर्वात लहान ग्रामपंचायत

परभणी : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली असून, बोरी ही सर्वात मोठी ग्रामपंचायत तर गंगाखेड तालुक्यातील ढेबेवाडी सर्वात छोटी ग्रामपंचायत आहे. या दोन्ही ग्रा.पं.च्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

जिंतूर तालुक्यातील बोरी हे मोठे गाव असून, या ठिकाणच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. मोठी बाजारपेठ, ग्रामपंचायतींतील आर्थिक उलाढाल आणि मुख्य रस्त्यांवरील महत्त्वाचे गाव असल्याने ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रतिष्ठा पणाला लावतात. यावेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. विजय भांबळे, भाजपाच्या आ. मेघना बोर्डीकर यांच्यासह काँग्रेसचे सुरेश नागरे यांचा पॅनल सक्रिय होत असल्याची चर्चा आहे. तीन प्रमुख पक्षांबरोबरच काही जण उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करण्याच्या तयारीतही आहेत. सध्या ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. यावेळेच्या निवडणुकीत ग्रा.पं. ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

गंगाखेड तालुक्यातील ढेबेवाडी ही सात सदस्य असलेली सर्वात छोटी ग्रामपंचायत ठरली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये केवळ ३६९ मतदार आहेत. ग्रामपंचायत छोटी असली तरी येथील निवडणूक नेहमीच चर्चेची ठरते. निवडणूक काळात झालेल्या वादांमुळे या ठिकाणी दोन वेळा गंभीर स्वरूपाच्या घटना घडल्या होत्या. निवडणुकीतून नेहमीच छोट्या मोठ्या कुरबुरी गावात घडत असल्याने ढेबेवाडी येथील ग्रामपंचायत अतिसंवेदनशील म्हणून ओळखली जाते. यावर्षीही या ग्रामपंचायतीत चुरशीची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. छोटी ग्रामपंचायत असली तरी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने लक्ष वेधले आहे.

Web Title: Bori is the largest and Dhebewadi is the smallest gram panchayat