तेव्हा मी अनुष्कासमोर रडलो - विराट

By Admin | Updated: June 3, 2015 12:59 IST2015-06-03T09:54:12+5:302015-06-03T12:59:13+5:30

ऑस्ट्रेलिया दौ-यादरम्यान मला कसोटीचा कर्णधार बनवण्यात आल्याने मोठा धक्का बसला व ड्रेसिंग रुममध्ये जाऊन मी अनुष्कासमोर रडलो होतो अशी कबुली विराट कोहलीने दिली आहे.

So I cried in front of Anuska - Virat | तेव्हा मी अनुष्कासमोर रडलो - विराट

तेव्हा मी अनुष्कासमोर रडलो - विराट

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - ऑस्ट्रेलिया दौ-यादरम्यान धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर मला कसोटीचा कर्णधार करण्यात आल्याने धक्का बसला आणि त्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन मी अनुष्कासमोर रडलो होतो, अशी कबुली टीम इंडियाचा स्टार प्लेयर विराट कोहलीने दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना त्याने कर्णधारपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळत वर्ल्ड क्रिकेटमध्ये दबदबा राहिला असा संघ तयार करायचा आहे, असा निर्धारही व्यक्त केला.
ऑस्ट्रेलियातील तीन कसोटींनंतर  महेंद्रसिंग धोनीने तडकाफडकी कसोटीतून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. धोनीच्या निवृत्तीनंतर कसोटीच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोहलीवर सोपवण्यात आली. मात्र या निर्णयामुळे आपल्याला धक्का बसल्याचे विराटने सांगितले. ती घटना आठवताना विराट सांगतो, 'मला कर्णधार बनवण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर काही काळाने मी ड्रेसिंग रूममध्ये गेलो. ती सीरिज पाहण्यासाठी अनुष्काही ऑस्ट्रेलियात आली होती. तिला मी या निर्णयाबद्दल सांगितल्यावर तीही अचंबित झाली. काही वेळ आम्ही दोघे शांत बसलो आणि त्यानंतर मला रडू कोसळलं. मला कधीही वाटलं नव्हतं की मी भारतीय संघाचे नेतृत्व करेन', अशा शब्दांत विराटने आपल्या भावना मांडल्या.
विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियावर बरीच टीका झाली. तो सामना पाहण्यासाठी आलेल्या अनुष्का शर्मावरही टीकेचा वर्षाव झाला होता, अनेकांनी तिच्या उपस्थितीबाबतच प्रश्न उपस्थित केला होता. 
 

Web Title: So I cried in front of Anuska - Virat