भारतीय नौदल संघाने केली शानदार आगेकूच; मुंबई बंदरचा ५३-४५ असा केला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 10:38 IST2026-05-02T10:37:29+5:302026-05-02T10:38:06+5:30
भारतीय नौदलाने धडकेबाज खेळ करताना मुंबई बंदरचे आव्हान ५३-४५ असे परतावले

भारतीय नौदल संघाने केली शानदार आगेकूच; मुंबई बंदरचा ५३-४५ असा केला पराभव
मुंबई - बलाढ्य भारतीय नौदल संघाकडून पराभव झाल्यानंतरही मुंबई बंदर संघाने अखिल भारतीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धेची बाद फेरी गाठली. भारतीय नौदलाने मुंबई बंदरचा ५३-४५ असा पराभव केला. दुसरीकडे, भारत पेट्रोलियम संघानेही कूच केली.
बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीने ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे ही स्पर्धा सुरू आहे. भारतीय नौदलाने धडकेबाज खेळ करताना मुंबई बंदरचे आव्हान ५३-४५ असे परतावले. नौदलाने पहिल्या डावात दोन, तर दुसऱ्या डावात एक लोण चढवून सामन्यात दबदबा राखला. नौदलाकडून हिमांशूने छाप पाडली. मुंबई बंदरकडून लोकेशने अपयशी झुंज दिली.
पेट्रोलियम संघाने अवघ्या एका गुणाने मारली बाजी
भारत पेट्रोलियमने थरारक झालेल्या सामन्यात अवघ्या एका गुणाने बाजी मारत दक्षिण मध्य रेल्वे संघाचा ५३-५२ असा पराभव केला. पहिल्या सत्रात दोन लोण देत भारत पेट्रोलियमने मध्यांतराला ३२-२१ अशी आघाडी मिळवली होती. यानंतर, अतिबचावात्मक पवित्रा घेतल्याचा फटका पेट्रोलियम संघाला बसला आणि रेल्वेने जबरदस्त पुनरागमन करीत सामना चुरशीचा केला. दुसऱ्या सत्रात पेट्रोलियम संघाने मिळविलेले ६ बोनस गुण निर्णायक ठरले. अनिल जस्ता याने तब्बल २५ गुण मिळवत पेट्रोलियमला विजयी केले. त्याला योगेश दहिया याने ६ पकडी करीत मोलाची साथ दिली.