उद्धव ठाकरेंचा 'आदेश' पोहोचला; गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात राजकीय भूकंपाची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 11:40 PM2020-01-30T23:40:11+5:302020-01-31T14:29:55+5:30

विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय बदल घडले.

 The possibility of a political earthquake in Navi Mumbai, the politics of vandalism before the elections | उद्धव ठाकरेंचा 'आदेश' पोहोचला; गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात राजकीय भूकंपाची शक्यता!

उद्धव ठाकरेंचा 'आदेश' पोहोचला; गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात राजकीय भूकंपाची शक्यता!

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीपूर्वी नवी मुंबईमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. भाजपचे १५ नगरसेवक शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रसच्या संपर्कात आहेत. शिवसेनेमध्येही अस्वस्थता निर्माण झाली असून कोणकोणत्या पक्षाला खिंडार पाडणार याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय बदल घडले. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे शहरातील राजकीय समीकरणेच बदलली होती. महापालिका निवडणुकीची चाहून लागताच पुन्हा शहरात राजकीय भूकंप घडविण्याची तयारी सुरू झाली आहे. नाईक परिवाराकडून महापालिका ताब्यात घेण्यासाठी शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादीने येथेही महाविकास आघाडी करून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही स्थितीमध्ये नवी मुंबई महापालिकेची सत्ता मिळविण्याच्या सूचना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पालकमंत्र्यांनी भाजपमध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एमआयडीसी परिसरामध्ये वर्चस्व असलेल्या ज्येष्ठ नगरसेवकास चार नगरसेवकांसह शिवसेनेत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी एक बैठकही घेण्यात आली आहे. लवकरच तुर्भे परिसरामध्ये भव्य हळदीकुंकू समारंभ घेण्यात येणार असून त्याला रश्मी ठाकरे यांना बोलावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ६ फेब्रुवारीला ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असून, त्या वेळीही हे नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. माथाडी संघटनेशी संबंधित असलेले कोपरखैरणे व तुर्भेमधील नगरसेवकांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले काही नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. ऐरोली मतदार संघामधीलही नाईक समर्थक नगरसेवकांना शिवसेनेत घेण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपमध्ये फूट पाडण्याच्या हालचाली सुरू केल्या असताना भाजपनेही सावध भूमिका घेत २००७प्रमाणे राजकीय भूकंप घडविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महाविकास आघाडी होणार असल्यामुळे शिवसेनेमधील इच्छुकांमध्ये नाराजी आहे. आघाडी झाल्यास या वेळीही महापालिकेसाठी उमेदवारी मिळणार नाही. यामुळे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे उपनेते व एक जिल्हाप्रमुख यांच्यामध्येही मतभेद निर्माण झाले असून, त्याची चर्चा शिवसेनेमध्ये सुरू आहे. याचा फटकाही निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या पाच नगरसेवकांच्या परिवारातील सदस्यांनी विधानसभा निवडणुकीमध्येच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामधील काहींची घरवापसी होण्याची चर्चा सुरू झाली आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये फोडाफोडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे स्पष्ट झाले असून कोणाकोणाचे नगरसेवक फोडणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीचा मेळावा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हा प्रयोग आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राबविण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी ४ फेब्रुवारीला विष्णुदास भावे नाट्यगृहात पहिला मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

जागावाटप करताना कसोटी

भारतीय जनता पक्षात फूट पडून १५ नगरसेवक शिवसेना व राष्ट्रवादीत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीमध्येही अद्याप सर्व आलबेल नाही. कोण किती जागा लढविणार यावर अद्याप एकमत झालेले नाही. शिवसेनेचे बहुतांश सर्व वॉर्डमध्ये संघटनात्मक बांधणी आहे. महाविकास आघाडी झाल्यास सानपाडा, सीवूड व इतर महत्त्वाच्या प्रभागांमध्ये शिवसेनेच्या सक्षम उमेदवारांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. आयत्या वेळी पक्षात आलेल्यांमध्ये अनेकांचे स्वप्न भंगणार असल्यामुळे अनेक इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण होऊ लागली आहे. मागील निवडणुकीप्रमाणे शिवसेनेमध्ये बंडखोरी होण्याची सर्वाधिक शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपचे १५ नगरसेवक फुटणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही. वास्तविक महापालिका निवडणुकीमध्ये पराभव दिसू लागल्यामुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने अफवा पसरवल्या जात आहेत.
- रामचंद्र घरत, जिल्हा अध्यक्ष, भाजप

Web Title:  The possibility of a political earthquake in Navi Mumbai, the politics of vandalism before the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.