वर्षभरात स्मार्ट सिटीतील सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 02:50 AM2020-01-25T02:50:06+5:302020-01-25T02:51:13+5:30

स्मार्ट सिटीतल्या वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.

Increase in cyber crime in Smart City throughout the year | वर्षभरात स्मार्ट सिटीतील सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ

वर्षभरात स्मार्ट सिटीतील सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ

googlenewsNext

- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : स्मार्ट सिटीतल्या वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. सोशल मीडियाच्या गैरवापरासह आॅनलाइन फसवणुकीच्या घटना घडत असून, त्याद्वारे मानहानीसह वित्तहानी होत आहे; परंतु सायबर गुन्ह्यांच्या तपासाची स्वतंत्र सक्षम यंत्रणा पोलिसांकडे नसल्याने गतवर्षात तपासाचेही प्रमाण घसरले आहे.

नवनवीन आयटी पार्क, आंतरराष्टÑीय विमानतळ याशिवाय जागतिक स्तरावर प्रसिद्ध कंपन्यांची कार्यालये यामुळे स्मार्ट सिटी म्हणून नवी मुंबईची ओळख देशपातळीवर होऊ लागली आहे; परंतु या स्मार्ट सिटीत सायबर गुन्हेगारांचे जाळे पसरत असून, ते मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. इंटरनेटचा वापर करताना पुरेपूर खबरदारी घेतली जात नसल्याने सायबर गुन्हेगारांना गुन्ह्यासाठी मोकळा मार्ग मिळत आहे. परिणामी, देशाबाहेरील अथवा शहरातच लपलेली अज्ञात व्यक्ती एखाद्याला सहन आॅनलाइन गंडा घालत आहे. अशा ६२ गुन्ह्यांची नोंद गतवर्षात नवी मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेकडे झालेली आहे. त्यामध्ये तब्बल दोन कोटी ४२ लाख ४२ हजार ९१७ रुपयांची फसवणूक झालेली आहे. त्यात फेसबुकवरील मैत्रीचा फायदा घेऊन ८५ लाख ९४ हजार ४०० रुपयांचा गंडा संबंधितांना घालण्यात आलेला आहे. तर आॅनलाइन फसवणुकीतून २१ लाख ३६ हजार ७७२ रुपये लुटण्यात आले आहेत. त्याशिवाय वेगवेगळ्या स्वरूपाच्या तब्बल ४१७ तक्रारी गतवर्षात सायबर सेलकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यातही सर्वाधिक तक्रारी आॅनलाइन फसवणूक व सोशल मीडियाद्वारे झालेल्या फसवणुकींचा समावेश आहे. मात्र, २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये या तक्रारींचे निराकरण करण्याचे प्रमाण घसरले आहे.

२०१८ मध्ये सायबर सेलकडे १२० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यात सोशल मीडियावरील फसवणुकीच्या ४६ तर आॅनलाइन फसवणुकीच्या ४९ तक्रारी होत्या. या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात तत्कालीन तपास अधिकाऱ्यांना यश आलेले आहे. मात्र, गतवर्षात या तक्रारींमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. एकूण ४१७ तक्रारीमध्ये आॅनलाइन फसवणुकीच्या १६७ तर सोशल मीडियाद्वारे फसवणुकीच्या ९७ तक्रारी आहेत. त्यापैकी सोशल मीडियाद्वारे फसवणुकीच्या ८६ व आॅनलाइन फसवणुकीच्या १४८ तक्रारींचा निपटारा झाला असून उर्वरित प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. तर वर्षभरात ४१७ पैकी ३५४ तक्रारींचा उलगडा होऊ शकलेला आहे. २०१८ च्या तुलनेत गतवर्षातील तपासाचे हे प्रमाण कमी आहे. परिणामी, स्मार्ट सिटीपुढे भविष्यातील गुन्हेगारीचे आव्हान पेलण्यास पोलीस अद्यापही सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. तर तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक संगिता अल्फान्सो, प्रतिभा शेडगे यांच्यानंतर सायबर सेलला तज्ज्ञ अधिकारी मिळालेला नसल्यानेही तपासावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची कमतरता
नवी मुंबईतल्या बदलत्या गुन्हेगारीच्या स्वरूपावरून येत्या काळात पोलिसांपुढे सायबर गुन्ह्यांच्या तपासाचे आव्हान निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे. हे आव्हान पेलण्यासाठी पोलिसांनाही तंत्रज्ञान अद्ययावत होऊन सायबर सेल सक्षम करण्याची गरज भासत आहे. त्याकरिता नवी मुंबई पोलिसांचे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे तयार करण्याचीही गरज आहे. तसे झाल्यास तज्ज्ञ अधिकाऱ्यांमार्फत सायबर गुन्ह्यांचा जलदगतीने निपटारा होऊ शकतो; परंतु सध्या स्थानिक पोलीस ठाण्यातच सायबर गुन्ह्यांची नोंद केली जात असून, त्याच्या तपासाकरिता सायबर सेलची मदत घेतली जात आहे.

Web Title: Increase in cyber crime in Smart City throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.