Coronavirus : नवी मुंबई शहरात अघोषित ‘जमावबंदी’, महापालिकेसह पोलीस यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 02:29 AM2020-03-16T02:29:46+5:302020-03-16T02:29:53+5:30

कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. व्हायरस बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्याचा संसर्ग अनेकांना होऊ शकतो. त्यामुळे पालिकेतर्फे गर्दीची सर्वच ठिकाणे बंद करण्यात आली आहेत.

Coronavirus : unannounced 'mob ban' in Navi Mumbai city, Police & municipal corporation on alert | Coronavirus : नवी मुंबई शहरात अघोषित ‘जमावबंदी’, महापालिकेसह पोलीस यंत्रणा सतर्क

Coronavirus : नवी मुंबई शहरात अघोषित ‘जमावबंदी’, महापालिकेसह पोलीस यंत्रणा सतर्क

Next

नवी मुंबई : कोरोना व्हायरसची जगभरात धास्ती वाढत असतानाच नवी मुंबईतही दोन रुग्ण आढळून आले आहेत. परंतु ते शहराबाहेरील असल्याने तात्पुरत्या कालावधीसाठी शहरात आले होते. दरम्यान, खबरदारीची उपाययोजना म्हणून पालिकेने शहरातील गर्दीच्या सर्वच ठिकाणी बंदीची घोषणा केली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या शहरात जमावबंदी लागू झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. व्हायरस बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्याचा संसर्ग अनेकांना होऊ शकतो. त्यामुळे पालिकेतर्फे गर्दीची सर्वच ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. त्यामध्ये मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा यांना बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे शनिवारपासूनच त्या सर्व ठिकाणी शुकशुकाट पसरला असतानाच रविवारी सभा व कार्यक्रमांनाही पालिकेतर्फे बंदी घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांसह मैदानात अथवा सार्वजनिक ठिकाणी होणा-या सामाजिक, राजकीय, धार्मिक तसेच शैक्षणिक व इतर प्रकारच्या कार्यक्रमांचाही समावेश आहे.

अशा ठिकाणी गर्दी जमल्यास संशयित रुग्णाकडून कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. त्याची खबरदारी म्हणून पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय जॉगिंग ट्रॅकच्या ठिकाणीदेखील सूचना फलक लावून पालिकेने ट्रॅकवर प्रवेशबंदी करून गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. तर शनिवारी रात्री शाळांना सुट्टी घोषित केल्यानंतर पालिकेनेही तशा प्रकारचे आदेश जारी केले. त्याद्वारे रविवारी बहुतांश खासगी शाळांनी पालकांना तशा प्रकारच्या सूचना देऊन ३१ मार्चपर्यंत शाळा बंद असल्याचे कळवले. नेरूळ येथील आर्मी कॉलनीत राहणाºया रुग्णास चाचणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांना संसर्ग झालेला नसल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले. मात्र त्यांच्याबाबतीत पसरणाºया अफवांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. तर बंदी नंतरही काही ठिकाणी रविवारी संध्याकाळपर्यंत मॉल सुरु ठेवण्यात आले होते.

शाळांना सुट्या असल्याने लहान मुलांची उद्यानांमध्ये गर्दी जमण्याची शक्यता आहे. यामुळे पालिकेने सर्व उद्यानेदेखील वापरासाठी बंद केली आहेत. तर शाळांसह खासगी क्लासेस, ग्रंथालये, मंगल कार्यालये, हॉटेल्स यांनाही पुढील आदेश येईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश पालिकेने काढले आहेत. कोरोनाचा संसर्ग फैलावण्यापासून रोखण्यासाठी पालिकेतर्फे हे आदेश घोषित करण्यात आल्याचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कळवले आहे. तर या नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्याशिवाय खोकताना व शिंकताना हातरुमालाचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही वस्तूला स्पर्श टाळावा.

पोलिसांकडून कार्यक्रमांचे परवाने रद्द
शहरात निवडणुकीचे वातावरण रंगत असल्याने अनेकांकडून छोटे-मोठे कार्यक्रम आखले जात आहेत. त्या सर्व कार्यक्रमांच्या परवानग्या पोलिसांकडून रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय पोलिसांना ‘नो शेक हँड’च्या सूचना करून पोलीस ठाण्यांमध्येही सॅनिटायझर पुरवण्यात आल्याचे परिमंडळ पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले. तर कोरोनाविषयी अफवा पसरवून भीती निर्माण करणाऱ्यांवरही पोलिसांकडून नजर ठेवली जाणार आहे.

शाळा-महाविद्यालये बंद
नवी मुंबईसह पनवेलमधील शाळा आणि महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश संबंधित महापालिका प्रशासनाने शनिवारी जारी केले. त्यानंतर बहुतांश शाळा व्यवस्थापनाने रविवारी पालकांना मेसेज पाठवून ३१ मार्चपर्यंत शाळा बंद राहणार असल्याचे जाहीर केले. तसेच कोरोनाच्या धास्तीने शहरातील अनेक खासगी कोचिंग क्लाससुद्धा बंद ठेवण्यात आले आहेत. तसा संदेश पालकांना प्राप्त झाला आहे. शहरात चालणारे क्रिकेट कोचिंग, फुटबॉल क्लबसुद्धा बंद ठेवण्यात आले आहेत.

एसटीसह लक्झरी बसेस रिकाम्या
कोरोनाच्या भीतीमुळे नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे वीकेण्ड असूनसुद्धा सायन-पनवेल महामार्गावर शुकशुकाट पाहावयास मिळाला. विशेष म्हणजे एरव्ही प्रवाशांनी भरून जाणा-या कोकण व मराठवाड्यातील एसटी आणि खासगी लक्झरी बसेससुद्धा मागील दोन-तीन दिवसांपासून रिकाम्या धावताना दिसत आहेत. महामार्गावरील वाशी सिग्नल, सानपाडा, एलपी जंक्शन, कळंबोली, खांदा कॉलनी व नवीन पनवेल येथील लक्झरी बसेसचे थांबे ओस पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नवी मुंबईतील दोन्ही संशयित रुग्ण शहराबाहेरचे
राज्यात कोरोनाचे संशयित रुग्ण सापडत असतानाच नवी मुंबईतही दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एक जण मूळचा फिलिपाइन्स देशाचा नागरिक असून तो टुरिस्ट व्हिसावर भारतात आला होता. यादरम्यान ३ ते १२ मार्च या कालावधीत वाशीतील नूर मशीद या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला होता.

त्याच्यावर मुंबईत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या सात व्यक्तींचीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून यामध्ये त्यांना बाधा झालेली नसल्याचे आढळून आले. ऐरोली येथील माइंड स्पेस या आयटी पार्कमध्ये एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्याच्यावर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तो कल्याणचा राहणारा असून, त्याला झालेल्या बाधेमुळे माइंड स्पेस बंद ठेवण्यात आली असून कर्मचाºयांना घरून काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर कोरोना बाधित कामगाराचा वावर संपूर्ण कंपनीत झालेला असल्याने कंपनीची संपूर्ण इमारत फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण करून घेण्यात आली आहे.
 

Web Title: Coronavirus : unannounced 'mob ban' in Navi Mumbai city, Police & municipal corporation on alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.