खंडित ट्रॅक अन् रस्त्याच्या कडेला पट्टे...; नवी मुंबईत फसला प्रयोग, ट्रॅकचा लहानांनाच उपयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 06:29 IST2026-05-02T06:29:19+5:302026-05-02T06:29:55+5:30
सायकलप्रेमींचा जीव धोक्यात: पामबीच मार्ग, सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर रस्स्ता येथे सायकलप्रेमी सराव करतात. येथून भरधाव वाहने जात असल्याने अपघाताचा धोका असतो.

खंडित ट्रॅक अन् रस्त्याच्या कडेला पट्टे...; नवी मुंबईत फसला प्रयोग, ट्रॅकचा लहानांनाच उपयोग
नामदेव मोरे
नवी मुंबई - महापालिकेने सहा ठिकाणी स्वतंत्र सायकल ट्रॅक विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. पामबीच मार्गाला लागून नेरूळमध्ये ट्रॅक विकसित करण्यात आला, परंतु इतर ठिकाणी जागा नसल्यामुळे स्वतंत्र ट्रॅकऐवजी मुख्य रस्त्याच्या कडेला सायकलसाठी पट्टे मारण्यात आले, परंतु हा प्रयोग सपशेल फसला आहे.
मुंबई, ठाणेमधील सायकलप्रेमीही अनेकदा नवी मुंबईतून पुणे आणि गोव्याच्या दिशेने सायकलिंगला प्राधान्य देतात. यासाठी सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर रस्ता व पामबीच मार्गाचा वापर केला जातो. फेब्रुवारी २०२४ मध्ये इंटेल इंडिया कंपनीचे माजी प्रमुख अवतार सैनी यांचा पामबीच मार्गावरून सायकल चालवत असताना कारने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. यानंतर पालिकेने शहरात सहा ठिकाणी ४० किलोमीटर अंतराचा सायकल ट्रॅक विकसित करण्याचा निर्णय घेतला.
बेलापूर, नेरूळ, ऐरोली व घणसोली येथे हे ट्रॅक विकसित केले जाणार होते. पामबीच मार्गाला लागून सारसोळे ते सीवूडच्या दरम्यान ट्रॅक करण्यात आला आहे, परंतु या मार्गात चार ठिकाणी रस्ता खंडित झाला आहे. लहान मुलांना सायकल चालविण्यासाठीच त्याचा वापर होत आहे. महापालिकेने वाशी सागर विहार परिसर, वंडर्स पार्कबाहेरील रस्ता, घणसोली पामबीच मार्ग व इतर काही ठिकाणी मुख्य रस्त्याच्या कडेला सायकलसाठी हिरवे पट्टे मारले होते, परंतु याचाही सायकलसाठी उपयोग होत नाही.
येथे होता सायकल ट्रॅकचा प्रस्ताव
पामबीच मार्गाच्या समांतर रस्त्यावर नवी मुंबई परिसरात ९ किमी.
ऐरोली डीएव्ही शाळा ते सेक्टर १४, १५ परिसर ३ किमी.
पटनी रस्त्यावर इच्छापूर्ती गणेश मंदिर ते पटनी कंपनीपर्यंत ६ किमी.
ज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरात बेलापूर रमाबाईनगर ते खारघरपर्यंत ४ किमी.
युलू सायकलही अल्पावधीत बंद
महापालिकेने शहरात सायकल वापर वाढावा, यासाठी युलू सायकल उपलब्ध करून दिल्या होत्या. रेल्वे स्थानक, बसडेपो व महत्त्वाच्या ठिकाणी या सायकल ठेवण्यात येत होत्या. अल्प दरात नागरिकांना सायकलचा वापर करता येत होता, परंतु योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा प्रयोगही फसला.
महापालिकेने नेरूळ येथे सायकल ट्रॅक तयार केला आहे. वाशी, घणसोली व इतर काही रस्त्यांच्या कडेला स्वतंत्र पट्टे मारले आहेत. शक्य असेल तेथे सायकलसाठी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे.- शिरीष आरदवाड, शहर अभियंता
सायकलसाठी लहान मार्गिकांचाउपयोग हाेत नाही. नेरुळ आणि इतर ठिकाणचे ट्रॅक लहान मुलांना उपयोगी ठरतात. लांब पल्ल्याचा सराव करण्यासाठी गैरसोय होत असून, जीव धोक्यात घालून पामबीच व महामार्गाचा वापर करावा लागतो. - किरण ढेबे, सायकलप्रेमी