कलिंगडाची ६३९ टन आवक, पण अफवेमुळे वाढली धास्ती; शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 07:16 IST2026-04-30T07:15:58+5:302026-04-30T07:16:25+5:30
गत आठवड्यात मुंबईमध्ये कलिंगड खाल्ल्यामुळे एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू झाली होती.

कलिंगडाची ६३९ टन आवक, पण अफवेमुळे वाढली धास्ती; शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती
नामदेव मोरे
नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवसांत ६३९ टन कलिंगडची आवक झाली असून, त्याची विक्रीही होत आहे. पण, या फळामुळे विषबाधा होते, अशा अफवा काही समाजकंटक पसरवित आहेत. त्यामुळे विक्रीवर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गत आठवड्यात मुंबईमध्ये कलिंगड खाल्ल्यामुळे एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू झाली होती. यानंतर काहींनी अफवा पसरविली.
‘कलिंगडमुळे विषबाधा होते, अशा अफवा पसरविल्या तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे,’ असे एपीएमसीचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.
कलिंगड येते कुठून?
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर, अहिल्यानगर, सांगली व सातारा परिसरातून कलिंगडाची आवक होत आहे. मंगळवारी ३७३ टन व बुधवारी ३६६ टन आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये ९ ते १६ रुपये किलो दराने व किरकोळ मार्केटमध्ये २० ते ३० रुपये किलो दराने कलिंगडची विक्री होत आहे, असे आवाहन कलिंगड व्यापारी शिवाजी चव्हाण यांनी केले आहे.
कलिंगड हे आरोग्यासाठी लाभदायक असून, उन्हाळ्यात उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी व पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत होते. अफवांमुळे कलिंगड खाणे थांबवू नये. - डॉ. श्याम मोरे, वैद्यकीय तज्ज्ञ