खाडीपुलाचे काम रखडणार, २९८ कोटींचा प्रस्ताव स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 12:21 AM2020-02-01T00:21:19+5:302020-02-01T00:21:58+5:30

नवी मुंबईमधील रखडलेल्या प्रकल्पांमध्ये घणसोली ते ऐरोली खाडीपुलाचा समावेश आहे.

298 crore proposal to halt, Khadi bridge work | खाडीपुलाचे काम रखडणार, २९८ कोटींचा प्रस्ताव स्थगित

खाडीपुलाचे काम रखडणार, २९८ कोटींचा प्रस्ताव स्थगित

Next

नवी मुंबई : पामबीच मार्गावर घणसोली ते ऐरोली दरम्यान खाडीपूल बांधण्याचा २९८ कोटी ९९ लाख रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेत मांडला होता. पुलाच्या बांधकामासाठी ५० टक्के रक्कम देण्याचे सिडकोने यापूर्वी मान्य केले होते. हा निधी गृहीत धरून प्रस्ताव तयार केला होता; परंतु दोन दिवसांपूर्वी १२५ कोटी रुपये काम झाल्यावर देण्याचे पत्र सिडकोने दिले आहे. यामुळे सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव स्थगित केला आहे.
नवी मुंबईमधील रखडलेल्या प्रकल्पांमध्ये घणसोली ते ऐरोली खाडीपुलाचा समावेश आहे. सिडकोने या पुलाचे बांधकाम करणे अपेक्षित होते; परंतु खारफुटीचा अडथळा आल्यामुळे ते वेळेत होऊ शकले नाही. दरम्यान, घणसोली नोड हस्तांतराची मागणी वाढू लागली. अखेर १४ डिसेंबर २०१६ मध्ये हा नोड महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आला. यामुळे या परिसरातील पायाभूत सुविधांची जबाबदारीही महापालिकेवर आली आहे. घणसोली ते ऐरोली दरम्यान १.९५ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधणे आवश्यक आहे. हे काम रखडल्यामुळे नागरिकांना ठाणे व मुलुंडला जाण्यासाठी ठाणे-बेलापूर रोडवरून वळसा घालून जावे लागत आहे. चार ते पाच किलोमीटरचा प्रवास वाढत आहे. महापालिकेने पामबीच रोडवर केबल स्टे ब्रीज बांधण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली होती. या पुलासाठी जवळपास ८०० कोटी रुपये खर्च लागणार असल्यामुळे तो प्रकल्प रद्द करण्यात आला. केबल स्टेऐवजी सर्वसाधारणत: बांधतात, त्या पद्धतीने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गामध्ये खारफुटी असल्यामुळे वन व पर्यावरण विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. पालिकेने त्यांच्या पॅनेलवरील सल्लागाराकडून ढोबळ अंदाजपत्रक तयार केले आहे. साधारणत: २९८ कोटी ९९ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देण्याचा प्रस्ताव जानेवारी महिन्यामधील विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला होता.
पामबीच रोडवर पूल बांधण्यासाठी सिडकोनेही निधी द्यावा, यासाठी महापालिकेने पाठपुरावा सुरू केला आहे. १५जुलै २०१९ मध्ये याविषयी बैठकही झाली होती. त्या बैठकीमध्ये ५० टक्के खर्च देण्यास सिडको प्रशासनाने सहमती दर्शविली होती. काम सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने हा निधी दिला जाणार होता; परंतु दोन दिवसांपूर्वी सिडकोने महापालिका प्रशासनाला पत्र देऊन या पुलाच्या कामासाठी १२५ कोटी रुपयेच देण्याची तयारी दर्शविली असून ही रक्कमही काम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. यामुळे शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मागे घेत असल्याचे सांगितले.

पाठपुरावा करण्याची भूमिका
सर्वसाधारण सभेमध्ये खाडीपुलाच्या प्रस्तावावर चर्चा करताना विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी हा प्रस्ताव मार्गी लावणे आवश्यक असल्याचे सांगितले. सिडकोकडून निधी मिळावा, यासाठी नगररचना विभागाकडे पाठपुरावा करू, महापालिकेने त्यासाठी पत्र द्यावे, अशी भूमिका मांडली. महापौर जयंवत सुतार यांनीही सिडकोकडून येणाऱ्या निधीचा प्रश्न मार्गी लागल्यास प्रस्ताव पुन्हा सभागृहात घेता येईल, असे सांगितले.

घणसोली ते ऐरोली दरम्यान खाडीपूल बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यासाठी लागणारा ५० टक्के खर्च सिडको देणार होती. टप्प्याटप्प्याने हा निधी येणार होता; परंतु सिडकोने पत्र देऊन १२५ कोटी रुपये देण्याचीच तयारी दर्शविली असून हा निधीही काम पूर्ण झाल्यानंतर देणार आहेत. यामुळे सद्यस्थितीमध्ये हा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
- सुरेंद्र पाटील, शहर अभियंता, महापालिका

Web Title: 298 crore proposal to halt, Khadi bridge work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.