गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 08:47 IST2026-04-25T08:46:31+5:302026-04-25T08:47:06+5:30

मुरूड तालुक्यातील नांदगाव येथील भवानी पाखाडी येथील जनार्दन चोरघे यांच्या नारळ-सुपारीच्या वाडीमधील विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू असताना मोठी शिळा सापडली.

A 'donkey' was found in a well while removing silt, a historical monument from the 14th century will be preserved | गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार

गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार

गणेश चोडणेकर
लोकमत न्यूज नेटवर्क

आगरदांडा: मुरूड तालुक्यातील नांदगाव येथील भवानी पाखाडी येथील जनार्दन चोरघे यांच्या नारळ-सुपारीच्या वाडीमधील विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू असताना मोठी शिळा सापडली. तिची लांबी व रुंदी ५६ इंच व २३ इंच असून, गधेगळ प्रकारातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा ठेवा चौदाव्या शतकातील राजा हंबीरराव यांच्या कारकीर्दीतील असल्याचे इतिहास अभ्यासकांनी सांगितले.

शिळेवर लिहिलेला लेख हा देवनागरी लिपीतील असून, त्यात काही प्रमाणात फारसी भाषेतील शब्दांचाही वापर केलेला आहे. तो इसवी सन १३६७-६८ मध्ये कोरण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लेखात नांदिगौ म्हणजे नांदगाव, मरूड म्हणजे मुरूड आणि चेऊळ म्हणजे चौल या गावांचा उल्लेख आहे. शिलालेखात ठाणे कोकण येथे राज्य करीत असणाऱ्या हंबीरराव या राजाचा उल्लेख ‘श्रीमत्य प्रौढिप्रताप चक्रवर्ती महाराजाधिराज’ असा आढळतो, तसेच राजा हंबीररावांचा प्रमुख प्रधान ‘सिहीप्रो’ याचा उल्लेख सर्वव्यापारी म्हणून करण्यात आला आहे. सिहीप्रो याने समंध नांदिगौ म्हणजेच नांदगाव आगारपैकी एक वाडी फळ भोगासहित घेऊन दान केली किंवा वाटून टाकली. त्या वाडीची किंमत ४०० द्राम एवढी होती. ही किंमत अदा करून हे दान राम जोशी, कृष्ण जोशी, कुम जोशी या तिघांमध्ये समान वाटून दिले. त्यांच्या मुलाबाळांनी ते वाटून घेतले, अशा आशयाचा शिलालेख कोरण्यात आला आहे. 

आजमितीस राजा हंबीररावांचे किमान ४ शिलालेख (देवनार - बीएआरसी मुंबई, रानवड - उरण, भीमेश्वर मंदिर नागाव, वाघ्रण, ता. अलिबाग इ.) उपलब्ध असून, नांदगावचा हा शिलालेख हंबीररावांच्या संदर्भातील पाचवा शिलालेख आहे. अनिकेत अशोक पाटील, इतिहास अभ्यासक

शिळेची वैशिष्ट्ये : शिळेचे तीन भागांत विभाजन केले असता शिळेच्या वरच्या भागात चंद्र-सूर्य, मध्यभागी मंगलकलश अशा आकृत्या कोरलेल्या आहेत. शिळेच्या मध्य भागात २३ ओळींचा लेख लिहिला असून, अंत्य (खालील) भागात गाढव आणि स्त्रीचे संकरशिल्प आहे.  

Web Title : कुएं में मिला प्राचीन 'गधेगल' पत्थर, 14वीं सदी का इतिहास संरक्षित

Web Summary : मुरुद के नांदगांव में एक कुएं में 14वीं सदी का 'गधेगल' शिलालेख मिला। शिलालेख में राजा हम्बीरराव और भूमि दान का उल्लेख है, जो क्षेत्र के अतीत में ऐतिहासिक अंतर्दृष्टि प्रदान करता है।

Web Title : Ancient 'Gadhegal' Stone Found in Well, Preserving 14th-Century History

Web Summary : A 14th-century 'Gadhegal' stone inscription was discovered in a well in Nandgaon, Murud. The inscription mentions King Hambirrao and land donations, providing historical insights into the region's past.