Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 15:34 IST2026-05-19T15:33:51+5:302026-05-19T15:34:34+5:30
Video - दोन हत्तींमध्ये झालेल्या झुंजीदरम्यान तामिळनाडूतील एका ३३ वर्षीय महिला पर्यटकाचा मृत्यू झाला.

Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
कर्नाटकच्या कोडागु जिल्ह्यात असलेल्या दुबारे एलीफेंट कॅम्पमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन हत्तींमध्ये झालेल्या जीवघेण्या झुंजीदरम्यान तामिळनाडूतील एका ३३ वर्षीय महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. हत्तींच्या आंघोळीच्या वेळी ही महिला कॅम्पमध्ये उपस्थित होती, त्याच वेळी अचानक दोन हत्ती आपापसात भिडले आणि महिला नेमकी त्यामध्ये सापडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कांचन आणि मार्थंडा या हत्तींना आंघोळ घालत असताना ही घटना घडली. आंघोळीदरम्यानच दोन्ही हत्तींमध्ये अचानक झुंज झाली. माहुतांनी हत्तींवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु परिस्थिती हाताबाहेर गेली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दोन्ही हत्ती एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. याच दरम्यान या महिलेचा पती आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन पत्नीला वाचवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे.
#Kodagu Sad incident occurred while #ElephantBathing at #DubareCamp 33-year-old woman from #Chennai died on the spot@aranya_kfd@eshwar_khandre@BoskyKhanna@prajna_grpic.twitter.com/73skY5l9ZU
— Amit Upadhye (@AmitSUpadhye) May 18, 2026
कशी घडली दुर्घटना?
'कांचन' नावाच्या हत्तीने मार्थंडावर जोरदार हल्ला केला, ज्यामुळे मार्थंडा खाली कोसळला. या अचानक झालेल्या गोंधळात महिला पर्यटक हत्तींच्या मध्ये अडकली आणि गंभीररीत्या चिरडली गेली. या भीषण दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कॅम्पमध्ये उपस्थित असलेल्या इतर पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आणि एकच पळापळ झाली. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी ही घटना अत्यंत क्लेशदायक असल्याचं म्हटलं आहे. या अपघातामुळे जंगली आणि प्रशिक्षित हत्तींच्या संदर्भात घ्यावयाच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.