उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 08:53 IST2025-09-08T08:52:25+5:302025-09-08T08:53:54+5:30
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे संयुक्त विरोधी पक्षांचे उमेदवार

उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
नवी दिल्ली : मंगळवारी होत असलेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीची जय्यत तयारी सुरू आहे. एनडीएच्या खासदारांनी दोन दिवसीय प्रशिक्षण घेतले, तर इंडिया आघाडीचे खासदार सोमवारी मॉक पोलद्वारे सराव करणार आहेत. या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे संयुक्त विरोधी पक्षांचे उमेदवार असून, त्यांच्यात थेट लढत होत आहे.
यावेळचे दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातील आहेत. राधाकृष्णन हे तामिळनाडूचे, तर रेड्डी तेलंगणाचे आहेत. भाजप खासदारांचे दोनदिवसीय प्रशिक्षण शनिवारी सुरू झाले होते, त्याची रविवारी सांगता झाली.
या प्रशिक्षणात पक्षाचा इतिहास, विकास व खासदारांची कार्यकुशलता वाढवण्यावर चर्चा केली. या प्रशिक्षणाचा मूळ उद्देश उपराष्ट्रपती निवडणुकीआधी खासदारांना योग्य दिशा देणे व १०० मतदानाचे प्रशिक्षण देणे, हा होता.
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी एनडीएच्या खासदारांना रात्रीभोजचे आयोजन केले होते. परंतु पंजाबसह अनेक राज्यांतील पूरस्थिती पाहता ते रद्द करण्यात आले. पंतप्रधान मोदी पूरग्रस्त राज्यांचा दौरा करून आढावा घेतील.
कसे करायचे मतदान? आज होणार खासदारांचा सराव
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याच्या प्रक्रियेची माहिती विरोधी पक्षांच्या खासदारांना सोमवारी देण्यात येणार आहे. संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये २.३० वा. मॉक पोल हाेणार आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोमवारी सायंकाळी विरोधी पक्षांच्या खासदारांना डिनर देणार होते. परंतु देशभरात असलेली पूरस्थिती पाहता ते रद्द करण्यात आले आहे.
मतदानावेळी पक्षनिष्ठेपेक्षा देशप्रेम लक्षात घ्या : रेड्डी
खासदारांनी पक्षनिष्ठेपेक्षा देशप्रेम लक्षात घेऊन मतदान करावे, असे आवाहन विरोधी पक्षांचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी रविवारी केले. त्यांनी म्हटले की, प्रिय राष्ट्राचा अंतरात्मा व आपल्या आत्म्याचा आवाज ऐकणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
ओवेसी यांचा रेड्डी यांना पाठिंबा : एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने रेड्डी यांना पाठिंबा देण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.
बीआरएस मतदानापासून दूर राहणार? : उपराष्ट्रपती निवडणुकीपासून बीआरएस दूर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पक्षाचे राज्यसभेत ४ खासदार आहेत.
मतदार किती आणि कोण?
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्य मतदान करणार आहेत. राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यही मतदानासाठी पात्र आहेत.
१७व्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणूक मंडळात एकूण ७८८ सदस्य आहेत (सध्या ७८१). यात राज्यसभेचे २३३ सदस्य निवडून आलेले आहेत. (पाच जागा सध्या रिक्त)
राज्यसभेचे १२ नामनिर्देशित सदस्य आहेत. लोकसभेचे ५४३ सदस्य (सध्या एक जागा रिक्त आहे.)
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी असलेले राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी यांनी सांगितले की, हे मतदान मंगळवारी संसद भवनातील वसुधा येथील कक्ष क्रमांक एफ-१०१मध्ये होईल.