लोकसभेतील धनाढ्य खासदार वाढले

By Admin | Updated: May 24, 2014 03:54 IST2014-05-24T03:54:26+5:302014-05-24T03:54:26+5:30

ताज्या लोकसभा निवडणुकीत फेरनिवड झालेल्या १६५ खासदारांच्या संपत्तीत २००९ ते २०१४ या काळात सरासरी १३७ टक्क्यांची वाढ झाली आहे़

The wealthy MPs of the Lok Sabha increased | लोकसभेतील धनाढ्य खासदार वाढले

लोकसभेतील धनाढ्य खासदार वाढले

नवी दिल्ली : ताज्या लोकसभा निवडणुकीत फेरनिवड झालेल्या १६५ खासदारांच्या संपत्तीत २००९ ते २०१४ या काळात सरासरी १३७ टक्क्यांची वाढ झाली आहे़ भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यात आघाडीवर आहेत़ असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स(एडीआर)च्या अहवालातून हे तथ्य समोर आले आहे़ अहवालात म्हटल्यानुसार, बॉलिवूडमधून राजकारणात आलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांची संपत्ती पाच वर्षांत ७७८ टक्क्यांनी वाढली आहे़ पटनासाहीब येथील लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या सिन्हांची संपत्ती २००९ मध्ये १५ कोटी होती़ २०१४ मध्ये ती वाढून १३१़७४ कोटी रुपये झाली़ या यादीत दुसरे स्थान ओडिशातील पुरीचे बीजू जनता दलाचे खासदार पिनाकी मिश्रा यांचे आहे़ त्यांची संपत्ती २९़६९ कोटी रुपयांवरून वाढून १३७़०९ कोटी रुपये झाली़ माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या यादीत तिसर्‍या स्थानावर आहेत़ बारामतीमधून याहीवेळी निवडून आलेल्या सुप्रियांची संपत्ती २००९ मध्ये ५१़५३ कोटी होती़ २०१४ मध्ये ती वाढून ११३़९० कोटी रुपये झाली़ एडीआरने फेरनिवड झालेल्या १६८ खासदारांपैकी १६५ जणांच्या संपत्तीच्या विवरणाचे विश्लेषण करून ही यादी तयार केली आहे़ उर्वरित तीन खासदारांच्या संपत्तीचे विश्लेषण केले जाऊ शकले नाही़ कारण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील त्यांनी सादर केलेले संपत्तीचे विवरण अस्पष्ट व अपूर्ण होते़

Web Title: The wealthy MPs of the Lok Sabha increased