कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी एकसंध दिसण्यापेक्षा ती विखुरलेली दिसत आहे. एकेकाळी राज्यावर दशकानुदशके राज्य करणारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डावी आघाडी व काँग्रेस यांची ‘तिसरी आघाडी’ यंदा पूर्णपणे विस्कळीत दिसत असून, तिचे अस्तित्व ‘केवळ मतांचे विभाजन करणारी शक्ती’ एवढ्यापर्यंत मर्यादित राहते की काय, अशी चिन्हे दिसत आहेत.
काँग्रेस, डावे पक्ष, आयएसएफ व इतर लहान अल्पसंख्याकांचा जनाधार असणारी पक्ष या सर्वांनी मिळून तयार होणारी पर्यायी शक्ती अनेक गटांमध्ये विखुरली गेली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजप यांच्यात थेट लढत होताना दिसत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेस, डावे, आयएसएफ, एजेयूपी आणि इतर लहान पक्षांच्या बहुकोनी लढती सुमारे ३५ ते ४० मतदारसंघांवर परिणाम करू शकतात. मुर्शिदाबाद, मालदा आणि उत्तर दिनाजपूर या मुस्लिमबहुल पट्ट्यात तिसऱ्या आघाडीचा काही प्रभाव अजूनही दिसतो.
कोणते मुद्दे महत्त्वाचे
तृणमूल : ममता बॅनर्जी यांनी ‘लक्ष्मी भंडार’सारख्या कल्याणकारी योजना आणि ‘बंगाली अस्मिता’ या जोरावर आपली पकड मजबूत ठेवली आहे. भाजप : आर. जी. कर रुग्णालयातील बलात्कार प्रकरण, बांगलादेशी घुसखोर आणि कथित भ्रष्टाचाराचे मुद्दे उचलून धरत ‘परिवर्तना’चा नारा भाजपने दिला आहे. तिसरी आघाडी : स्वतःचे स्वतंत्र नरॅटिव्ह तयार करण्यात अपयश आल्याचे दिसते.
तज्ज्ञांच्या मते, विरोधी मतांचे विभाजन काही ठिकाणी तृणमूलला, तर काही ठिकाणी भाजपला फायदा देऊ शकते. जिथे सत्ताविरोधी लाट आहे व एकत्रित पर्याय नाही, तिथे मतदार भाजपकडे झुकण्याची शक्यता आहे. अल्पसंख्याक बहुल भागात मुस्लिम मतांचे विभाजन झाल्यास तृणमूलला तोटा होऊ शकतो.
काँग्रेसला खातेही उघडता येणार नाही : अमित शाह
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला साधे खातेही उघडता येणार नाही आणि आसाममध्ये या पक्षाचा आजवरचा सर्वात मानहानिकारक पराभव होईल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. काँग्रेसला लक्ष्य करताना गृहमंत्र्यांनी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकेची झोड उठवली. न्यू बॅरकपूरजवळील दमदम येथे प्रचार सभेला संबोधित करताना बुधवारी ते बोलत होते.
राहुल गांधी यांच्या रद्द सभा दुसऱ्या दिवशी होणार
पोलिसांच्या परवानगीअभावी २३ एप्रिल रोजी कोलकाता आणि श्रीरामपूर येथील राहुल गांधी यांच्या सभा रद्द केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, काँग्रेसने बुधवारी पोलिस अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्या सभा २५ एप्रिल रोजी पुनर्निर्धारित केल्या. पक्षाच्या सूत्रांनी ही माहिती दिली.पहिली सभा कोलकाता येथील शहीद मिनार मैदानावर दुपारी २:३० च्या सुमारास होईल आणि दुसरी सभा २५ एप्रिल रोजी हुगळी जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे होईल.
Web Summary : West Bengal sees a direct Trinamool-BJP fight as the Third Front weakens. Congress struggles; Shah predicts losses. Rahul Gandhi's rallies rescheduled.
Web Summary : पश्चिम बंगाल में तृणमूल और बीजेपी के बीच सीधी टक्कर है क्योंकि तीसरा मोर्चा कमजोर हो रहा है। कांग्रेस संघर्ष कर रही है; शाह ने हार की भविष्यवाणी की। राहुल गांधी की रैलियां पुनर्निर्धारित।