मुंबई - शहरातील साकीनाका आणि बोरिवली पोलीस ठाण्यात फ्रेट फॉरवर्डिंग व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आले आहे. कोलकात्यातील काही आरोपींनी सुनियोजितपणे मुंबईतील लॉजिस्टिक कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
आरोपींनी कशी केली फसवणूक?
या घटनेतील आरोपींनी मुंबईतील काही कंपन्यांना क्रेडिट सिस्टमचा फायदा घेत कोट्यवधींना लुबाडले. आरोपींनी स्वतःला कोलकाता येथील प्रतिष्ठित फ्रेट कंपनीचे संचालक असल्याचे भासवले. सुरुवातीला त्यांनी प्रत्येक शिपमेंटवर ५० टक्के आगाऊ रक्कम आणि उर्वरित पैसे ठराविक कालावधीत देऊ असे आश्वासन दिले. काही व्यवहारांत सुरुवातीला वेळेवर पेमेंट करून विश्वास जिंकण्यात आला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर शिपमेंट्स देण्यास प्रवृत्त करून पेमेंट देण्यास टाळाटाळ सुरू केली. विविध कारणे सांगत पैसे देण्यात वेळ काढण्यात आला. पुढे मोठ्या रकमेचे चेक देण्यात आले, परंतु ते बाऊन्स झाल्याचे समोर आले. या घटनेतील आरोपींनी अंधेरीतील एका कंपनीला ५.७४ कोटी आणि दुसऱ्या एका कंपनीला २३ लाखांनी फसवल्याचे समोर आले. तपासातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी क्लायंटकडून येणारे पैसे मूळ कंपनीकडे न वळवता दुसऱ्याच कंपनीत जमा केल्याचे उघड झाले. आधी विश्वास जिंकणे मग काम झाल्यानंतर पेमेंट रखडवणे असा हा संपूर्ण पॅटर्न आरोपींकडून राबवण्यात येत होता.
या घटनेतील मुख्य आरोपी इम्रान जान कोलकाता-आधारित ULR Freight Services या कंपनीशी संबंधित असल्याचे सांगत होता. त्याने स्वतःला कंपनीचा डायरेक्टर म्हणून पुढे करत मुंबईतील कंपन्यांशी संपर्क साधला. इम्रानने थेट ई-मेल व फोनद्वारे कंपन्यांशी संपर्क केला. मोठ्या प्रमाणावर शिपमेंट देऊ असं कंपन्यांना बतावणी केली. सुरुवातीला काही प्रमाणात पैसे देऊन कंपन्यांचा विश्वास जिंकला. त्यानंतर मोठी कामे करून पैसे रखडवले. कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचे चेक दिले परंतु ते वटले नाहीत. इम्रानने क्लायंटकडून येणारे पैसे ULR कंपनीत न घेता I-Logistic मध्ये वळवले. I-Logistic नावाची कंपनी इम्रानची आहे. साकीनाका येथे याबाबत पहिली तक्रार समोर येताच पोलिसांना तात्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपी इम्रानला कोलकाता येथून अटक केली. या संपूर्ण फसवणुकीच्या रॅकेटमागे इम्रान हा मास्टरमाईड असला तरी यात आणखी काही मोठी नावे समोर येऊ शकतात.
फ्रेट फॉरवर्डिंग व्यवसाय कसा चालतो?
फ्रेट फॉरवर्डिंग हा व्यवसाय हा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्यासाठी काम करतात. क्लायंट कंपनी माल पाठवण्याची ऑर्डर देते. फ्रेट फॉरवर्डर शिपमेंट बुक करून हवाई अथवा सागरी मार्गाने माल परदेशात पाठवतात. त्यात कस्टम क्लिअरन्स, वेअरहाऊसिंग आणि डॉक्युमेंटेशन इत्यादी कामे फ्रेट फॉरवर्डर कंपनीकडून सांभाळण्यात येतात. माल संबंधित ठिकाणी पोहचल्यानंतर क्लायंटकडून पैसे घेतले जातात. या व्यवसायात विश्वास आणि क्रेडिट सिस्टम खूप महत्त्वाची असते. अनेक व्यवहार क्रेडिटवर चालतात.
दरम्यान, या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपींनी लुबाडलेली रक्कम नेमकी कुठे व कशासाठी वापरली याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे मुंबईतील लॉजिस्टिक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले असून व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज स्पष्ट झाली आहे.
Web Summary : A Kolkata-based gang defrauded Mumbai logistics firms of crores through a freight forwarding scheme. They gained trust with initial payments, then defaulted on larger shipments, issuing bounced checks. One arrest has been made; investigation ongoing.
Web Summary : कोलकाता स्थित एक गिरोह ने फ्रेट फॉरवर्डिंग योजना के माध्यम से मुंबई की लॉजिस्टिक्स कंपनियों को करोड़ों का चूना लगाया। उन्होंने शुरुआती भुगतान से विश्वास हासिल किया, फिर बड़े शिपमेंट पर डिफ़ॉल्ट किया, बाउंस चेक जारी किए। एक गिरफ्तारी हुई; जांच जारी है।