Abhishek Banerjee : "दिल्ली सांभाळता येत नाही अन् बंगालमध्ये येऊन मतं..."; अभिषेक बॅनर्जींचा मोदी-शाहांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:31 IST2026-01-24T14:31:23+5:302026-01-24T14:31:49+5:30
Abhishek Banerjee : तृणमूल काँग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Abhishek Banerjee : "दिल्ली सांभाळता येत नाही अन् बंगालमध्ये येऊन मतं..."; अभिषेक बॅनर्जींचा मोदी-शाहांवर निशाणा
दिल्लीत गुलाब विकणाऱ्या १० वर्षांच्या चिमुकलीला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे जनतेत संतापाची लाट असून आता यावरून राजकारणही तापलं आहे. तृणमूल काँग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी या घटनेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. दिल्ली आज भारताची 'रेप कॅपिटल' बनत चालली असून, ही घटना निर्भया प्रकरणाची दुःखद पुनरावृत्ती आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह बंगालमध्ये येऊन परिवर्तनाच्या गप्पा मारत आहेत. कदाचित ते परिवर्तन आधी भाजपाशासित राज्यांपासून सुरू व्हायला हवं. ज्या सरकारमध्ये महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची क्षमता नाही, जे सरकार शुद्ध हवा-पाणी देऊ शकत नाही किंवा स्फोट रोखू शकत नाही, दिल्ली सांभाळता येत नाही, त्या सरकारला बंगालमध्ये येऊन मतं मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही."
Delhi holds on to its dubious distinction as the RAPE CAPITAL of India. In a harrowing echo of the Nirbhaya tragedy, an innocent 11-year-old girl, eking out a living by selling roses at traffic signals, was abducted, raped, and abandoned in an unconscious state in a forested…
— Abhishek Banerjee (@abhishekaitc) January 22, 2026
दिल्लीतील ट्रॅफिक सिग्नलवर एक अल्पवयीन मुलगी गुलाब विकायची. एका ई-रिक्षा चालकाने या १० वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर तिला चहाच्या बहाण्याने बिलकापूर नावाच्या परिसरातील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडितेला बेशुद्धावस्थेत सोडून आरोपी पसार झाला होता. ही घटना १० जानेवारी रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस तपासात पीडितेने सांगितलं की, आरोपीने तिला जंगलात नेऊन एका खोलीत तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता रक्ताच्या थारोळ्यात आणि बेशुद्ध पडली होती, ती मेली आहे असे समजून आरोपी तिथून पळून गेला. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने कसाबसा आपला घरचा रस्ता गाठला. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आणि पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.