आयकर विभागाचे कामकाज ठप्प होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 10:48 IST2026-04-15T10:46:31+5:302026-04-15T10:48:38+5:30
Income Tax: विविध प्रलंबित मागण्या आणि कामकाजाच्या कठीण परिस्थितीकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत, आयकर विभागाच्या दोन प्रमुख कर्मचारी संघटनांनी १६ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आयकर विभागाचे कामकाज ठप्प होणार
नवी दिल्ली - विविध प्रलंबित मागण्या आणि कामकाजाच्या कठीण परिस्थितीकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत, आयकर विभागाच्या दोन प्रमुख कर्मचारी संघटनांनी १६ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दोन्ही संघटनांच्या ‘संयुक्त कृती परिषदे’च्या (जेसीए) नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात विभागातील सुमारे ९७ टक्के कर्मचारी सहभागी होणार आहेत.
संघटनांच्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या १३ वर्षांपासून ‘कॅडर रिव्ह्यू’ आणि पुनर्रचनेचे काम प्रलंबित आहे. यामुळे पदोन्नतीमध्ये अडथळे येत आहेत. याशिवाय, अतार्किक वार्षिक बदल्या, पायाभूत सुविधांची कमतरता आणि कामाचा प्रचंड ताण यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
असे असेल आंदोलनाचे स्वरूप
१६ एप्रिल : दुपारच्या सुट्टीत निदर्शने करून आंदोलनाची सुरुवात.
पुढील टप्पे : काळ्या फिती लावून काम करणे आणि सांख्यिकीय अहवाल सादर न करणे.
१३ मे : मागण्या मान्य न झाल्यास एक दिवसाचा लाक्षणिक संप.