‘मंगळ यान’ ‘ब्लॅक आऊट’ टप्प्यात

By Admin | Updated: June 7, 2015 23:18 IST2015-06-07T23:18:07+5:302015-06-07T23:18:07+5:30

मंगळ ग्रहाचे परिभ्रमण करीत असलेले भारताचे पहिले आंतरग्रहीय मिशन ‘मंगळ यान’ आज सोमवारपासून १५ दिवसांच्या ‘ब्लॅक आऊट’ स्थितीत प्रवेश करणार आहे.

In the 'Tangal Yan' 'Black Out' stage | ‘मंगळ यान’ ‘ब्लॅक आऊट’ टप्प्यात

‘मंगळ यान’ ‘ब्लॅक आऊट’ टप्प्यात

बंगळुरू : मंगळ ग्रहाचे परिभ्रमण करीत असलेले भारताचे पहिले आंतरग्रहीय मिशन ‘मंगळ यान’ आज सोमवारपासून १५ दिवसांच्या ‘ब्लॅक आऊट’ स्थितीत प्रवेश करणार आहे. या अवस्थेत मंगळ यानाचा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटलेला असेल.
८ ते २२ जून या काळात मंगळ आणि पृथ्वी यांच्या मध्ये सूर्य आल्याकारणाने मंगळ यानाचा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटणार आहे. या काळात मंगळ यान ‘स्वचलित मोड’वर कार्यरत राहील आणि स्वत:च स्वत:ला निर्देश देईल. मंगळ यान अशा १५ दिवसांच्या सुप्तावस्थेत (ब्लॅक आऊट) जाण्याची आणि त्याचा पृथ्वीसोबत असलेला संपर्क विच्छेद होण्याची ही पहिलीच वेळ असेल. ही सुप्तावस्था संपल्यानंतर मात्र मंगळ यानाचा पुन्हा पृथ्वीशी संपर्क स्थापित केला जाईल, असे इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ४५० कोटी रुपये खर्चाच्या या मंगळ यानाचा सहा महिन्यांचा कार्यकाळ मार्चमध्ये समाप्त झाला होता; परंतु इंधन शिल्लक राहिल्यामुळे त्याचा कार्यकाळ आणखी सहा महिन्यांनी वाढविण्यात आला होता. 
मंगळ यान ५ नोव्हेंबर २०१३ रोजी पीएसएलव्हीद्वारे आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले होते आणि ते नऊ महिन्यांनंतर २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थापित करण्यात आले होते.
‘ब्लॅक आऊट’दरम्यान मंगळ यान एका ‘स्वतंत्र मोड’मध्ये जाईल आणि स्वत:च आपला निर्णय घेईल. १५ दिवसांच्या दीर्घ अवधीपर्यंत मंगळ यानाशी संपर्क न राहण्याची ही पहिलीच वेळ असेल, असे ‘इस्रो’च्या अधिकाऱ्याने सांगितले.
हा ‘ब्लॅक आऊट’चा काळ संपल्यानंतर उपग्रहावर पुन्हा नियंत्रण मिळविले जाईल, असा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला. मंगळ यानाला ब्लॅक आऊटसाठी तयार केले जात आहे. आता आम्ही या अंतराळ यानाला कोणताही संदेश पाठविणे थांबविले आहे. ८ जूनपर्यंत दररोज दोन ते तीन तासांचे संकेत मंगळ यानाला पाठविले जातील. या मिशनची मुदत आणखी वाढविण्यात आली तर पुढच्या वर्षीदेखील हे मंगळयान ब्लॅक आऊट टप्प्यातून जाईल. (वृत्तसंस्था)

Web Title: In the 'Tangal Yan' 'Black Out' stage