नोकरी सोडली, खिशातले पैसे खर्च केले; पण पराभवानंतर लेकीने विचारलेल्या 'त्या' प्रश्नाने बाप निरुत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 13:37 IST2026-05-08T13:30:19+5:302026-05-08T13:37:02+5:30
Ananthan Ayyasamy : अमेरिकेतील सुखी आयुष्य सोडून भारतात निवडणुकीसाठी आलेल्या अनंतन अय्यासामी यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

नोकरी सोडली, खिशातले पैसे खर्च केले; पण पराभवानंतर लेकीने विचारलेल्या 'त्या' प्रश्नाने बाप निरुत्तर!
Tamil Nadu Assembly Elections 2026: अमेरिकेतील इंटेलसारख्या नामांकित कंपनीत इंजिनीअरिंग डायरेक्टरचे पद, हाती बक्कळ पैसा आणि यशस्वी उद्योजक म्हणून नाव... एका सामान्य भारतीयाला असंच काहीसं आयुष्य हवं असतं. तमिळनाडूचे अनंतन अय्यासामी हेदेखील असेच आयुष्य जगत होते. पण मातृभूमीच्या ओढीने त्यांनी हे सर्व सोडून भारतात परतण्याचा धाडसी निर्णय घेतला. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्यावर अशी वेळ आली की, त्यांच्या १२ वर्षांच्या मुलीने विचारलेल्या एका साध्या प्रश्नाला उत्तर देणे त्यांना कठीण झालं आहे.
अनंतन अय्यासामी यांनी आपल्या देशासाठी काहीतरी करण्याच्या जिद्दीतून भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेतील सर्व संपत्ती, प्रतिष्ठा आणि सुरक्षित भविष्य बाजूला ठेवून ते तमिळनाडूमधील आपल्या तेनकाशी जिल्ह्यात परतले. त्यांच्या या प्रवासात सर्वात कठीण क्षण हा, जेव्हा त्यांनी त्यांच्या १२ वर्षांच्या मुलीला सांगितले की ते लोकांच्या सेवेसाठी तिला सोडून भारतात जात आहेत हा होता. त्यावेळी त्या चिमुरडीला राजकारण किंवा समाजकारण म्हणजे काय, हे समजत नव्हते. तिला फक्त तिचे वडील तिच्यापासून दूर जात आहेत एवढेच माहित होते.
चार वर्ष रक्त आटवणारे परिश्रम
भारतात परतल्यानंतर अय्यासामी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तेनकाशी जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. गेल्या चार वर्षांत त्यांनी जमिनीवर उतरून काम केले. त्यांनी १०० एकरचा तलाव स्वच्छ केला, पाण्याचे बांध मजबूत केले आणि आक्रमक झाडे काढून हजारो ताडाची रोपे लावली. बस थांबे बांधणे, कम्युनिटी शेड उभारणे आणि विद्यार्थ्यांसाठी करिअर वर्कशॉप्स आयोजित करणे यासारखीही कामे केली. यासोबत वैद्यकीय शिबिरे भरवली आणि तरुणांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन दिले. २०३२ पर्यंत तेनकाशीमध्ये १ लाख हाय-टेक नोकऱ्या निर्माण करणे आणि या भागाला तंत्रज्ञानाचे केंद्र बनवणे हे त्यांचे ध्येय होते.
Four years ago, I sat down with my 12-year-old daughter in the US and told her I was walking away from a successful tech career and real estate business to return to India for public service and politics.
— Ananthan Ayyasamy (@AnanthAyyasamy) May 7, 2026
At that age, she didn’t realize “public life” would slowly take her Appa… pic.twitter.com/n6URWPVCyC
"निवडणुकीतील पैशाने पराभव केला"
स्वतःचे कोट्यवधी रुपये खर्च करूनही, विधानसभा निवडणुकीच्या निकालात अय्यासामी यांना पराभवाचा सामना करावा लागला. तेनकाशी मतदारसंघातून डीएमकेच्या कलाई काथिरावन यांनी विजय मिळवला.
या पराभवानंतर अय्यासामी यांनी एक भावूक पोस्ट लिहिली. "मी स्वतःचे कमावलेले कोट्यवधी रुपये खर्च केले, पण त्याहून अधिक मी माझ्या कुटुंबाचा वेळ आणि माझ्या मुलीचे बालपण गमावले. शेवटी, निवडणुकीच्या काळात वाटल्या गेलेल्या एका आठवड्याच्या पैशाने माझ्या चार वर्षांच्या प्रामाणिक सेवेचा पराभव केला," असं अय्यासामी म्हणाले.
मुलीचा तो प्रश्न आणि अय्यासामी निरुत्तर
निकालानंतर अय्यासामी यांच्या मुलीने त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि एक प्रश्न विचारला, "अप्पा, आता तरी मला सांगाल का की राजकारण म्हणजे नक्की काय असतं? माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या लाडक्या लेकीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते," असं अय्यासामी म्हणाले.