Subramania Bharathi : शाब्बास पोरा! बापाने वीटभट्टीत घाम गाळला, लेकाने केलं कष्टाचं सोनं; आता होणार 'मोठा साहेब'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 15:40 IST2026-03-15T15:40:16+5:302026-03-15T15:40:49+5:30
Subramania Bharathi : सुब्रमण्यम भारती याने पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा २०२५ मध्ये यश संपादन केलं आहे.

Subramania Bharathi : शाब्बास पोरा! बापाने वीटभट्टीत घाम गाळला, लेकाने केलं कष्टाचं सोनं; आता होणार 'मोठा साहेब'
रखरखतं ऊन, वीटभट्टीवरचं काम, हाताला आलेले फोड आणि डोळ्यांत फक्त एकच स्वप्न... आपल्या मुलाने शिकून मोठा साहेब व्हावं. गरिबी, संघर्षाच्या परिस्थितीतही मुलाने हार मानली नाही. प्रत्येक संकटाला त्याने आपली ताकद बनवलं आणि पुढे जाण्याचा निर्धार केला. याच संघर्षाचे फळ म्हणजे, सुब्रमण्यम भारती याने पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा २०२५ मध्ये यश संपादन केलं आहे. सुब्रमण्यमची ही यशोगाथा केवळ एक यश नसून, 'परिस्थिती कशीही असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ शकतं या विश्वासाचा विजय आहे.
ANI शी बोलताना सुब्रमण्यम भारती म्हणाला की, "माझा हा प्रवास खरोखरच चमत्कारिक राहिला आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न होता. सरकारी योजना आणि कोचिंगच्या मदतीने मी हे यश मिळवू शकलो. वयाच्या १८ व्या वर्षी कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय मी यूपीएससीचा अभ्यास सुरू केला होता. माझे आई-वडील हेच माझी पहिली प्रेरणा आहेत."
भारतीचं प्राथमिक शिक्षण तमिळ माध्यमातून झाले आहे. त्यानंतर त्याने इतिहास विषयात बीए (BA) पदवी पूर्ण केली. आपल्या यशाचं श्रेय त्याने राज्य सरकारच्या 'नान मुधलवन' (Naan Mudhalvan) योजना आणि एका कोचिंग सेंटरला दिलं आहे. या योजनेमुळे त्याला योग्य दिशा, अभ्यास साहित्य आणि मार्गदर्शन मिळण्यास मोठी मदत झाली.
भारतीचे वडील मारिअप्पन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आमची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, आम्ही विटा बनवण्यासाठी मजुरीचं काम करतो. कठीण परिस्थिती असूनही मुलाने शिक्षण सोडलं नाही. त्याच्या शिक्षणासाठी जे काही शक्य होतं, त्या सर्व गरजा आम्ही पूर्ण केल्या. त्याच्या अफाट कष्टांमुळेच त्याला हे यश मिळालं आहे."
सुब्रमण्यमने नागरी सेवेची निवड केली कारण त्याला तळागाळातील लोकांसाठी थेट काम करायचं आहे. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि अभ्यासाप्रती असलेल्या समर्पणामुळे त्याने UPSC २०२५ च्या निकालात पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं. या परीक्षेत त्याने ७७८ वा रँक मिळवला आहे. आता अधिकारी बनून तो स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे स्वप्न साकार करेल. कठीण परिस्थितीतही परीक्षा उत्तीर्ण होऊन सुब्रमण्यमने सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे