केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 10:50 IST2026-05-08T10:48:41+5:302026-05-08T10:50:43+5:30
६३ आमदारांव्यतिरिक्त माकन आणि वासनिक यांनी काँग्रेस खासदार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या पसंती जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेतल्या.

केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
नवी दिल्ली - केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर तिथे सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने पाठवलेल्या निरिक्षकांनी केरळमधील आमदारांसोबत वन टू वन भेट घेतली. या भेटीत काँग्रेसच्या ६३ आमदारांपैकी ४७ आमदारांनी वेणुगोपाल यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. या ४७ आमदारांमध्ये केरळचे प्रदेशाध्यक्ष सन्नी जोसेफ यांचाही समावेश आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत पार्टी हायकमांडकडून केरळच्या मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा होऊ शकते.
सन्नी यांच्यासोबतच संदीप जी वारियर, सजीव जोसेफ, टी.ओ मोहन आणि उषा विजयन यांनीही वेणुगोपाल यांच्या नावाच्या प्रस्तावाला सहमती दिली आहे. केरळमधील नवनियुक्त आमदारांपैकी बहुतांश वेणुगोपाल यांच्या नावाला समर्थन देत असल्याने या पदासाठी दुसरे प्रमुख दावेदार रमेश चेन्नीथला यांना मोठा झटका बसला आहे. यात आय.सी बालकृष्णन यांनी वेणुगोपाल आणि चेन्नीथला या दोघांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. माजी विरोधी पक्षनेत्याला ८ आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. या पदासाठी ज्यांना लोकप्रिय उमेदवार म्हणून पाहिले जात अशा विद्यमान विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांना सहा आमदारांचा पाठिंबा आहे. सतीशन आणि चेन्नीथला या दोघांनीही निरीक्षकांची भेट घेऊन या पदासाठी आपला दावा सांगितला आहे. वेणुगोपाल या बैठकीला उपस्थित नव्हते.
६३ आमदारांव्यतिरिक्त माकन आणि वासनिक यांनी काँग्रेस खासदार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या पसंती जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेतल्या. तीन माजी केपीसीसी अध्यक्षांनी सतीशन यांना पाठिंबा दिला तर अनेक वरिष्ठ नेत्यांनी वेणुगोपाल यांना पाठिंबा दिला. नवी दिल्लीत परतलेले निरीक्षक आपला अहवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सादर करतील. गरज भासल्यास हायकमांड सन्नी जोसेफ, केपीसीसीचे तीन कार्याध्यक्ष तसेच सतीशन आणि चेन्नीथला यांना चर्चेसाठी बोलावतील.
दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पुढील मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करण्याचा अधिकार खर्गे यांना एकमताने देण्यात आला. योग्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हायकमांड शनिवार किंवा रविवारपर्यंत पुढील मुख्यमंत्र्यांची घोषणा करतील आणि घोषणेनंतर दोन दिवसांच्या आत नवीन मुख्यमंत्री, काँग्रेसचे दोन वरिष्ठ नेते आणि इतर यूडीएफ घटक पक्षांच्या नेत्यांसह शपथविधी सोहळा पार पडेल असं सूत्रांनी सांगितले आहे.