'शशी थरूर यांचा माइक बंद, राहुल गांधी...' गौरव गोगोईंचे ओम बिर्लांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:53 IST2026-03-10T15:52:30+5:302026-03-10T15:53:14+5:30
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे.

'शशी थरूर यांचा माइक बंद, राहुल गांधी...' गौरव गोगोईंचे ओम बिर्लांवर गंभीर आरोप
Gaurav Gogoi Slams On Birla: लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. आज यावर सभागृहातील चर्चेदरम्यान, काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संसदेतील चर्चेवेळी सभापती पूर्णपणे निष्पक्ष राहतील अशी अपेक्षा असते, मात्र प्रत्यक्षात विरोधी पक्षांच्या नेत्यांना आपले मत मांडण्याची संधी दिली जात नाही, असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधींना वारंवार थांबवले: गोगोई
गोगोई यांनी सांगितले की, माजी लष्करप्रमुख एम.एम.नरवणे यांच्या पुस्तकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलत होते. त्या वेळी सभागृहात निष्पक्षता राखली जाईल अशी अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही. राहुल गांधी बोलत असताना त्यांना अनेक वेळा थांबवण्यात आले. सभापती त्यांना वारंवार त्यांच्या वक्तव्याची पडताळणी करण्यास सांगत होते.
VIDEO | New Delhi: "I don't want to personally attack Om Birla, but it's our duty to protect the dignity of the House," says Congress MP Gaurav Gogoi (@GauravGogoiAsm) in Lok Sabha on moving no-trust resolution against Speaker.
— Press Trust of India (@PTI_News) March 10, 2026
(Source: Third Party)
(Full video available on PTI… pic.twitter.com/Wq13Kd205p
राहुल गांधी वारंवार त्यांना बोलू देण्याची विनंती करत होते, मात्र ते उभे असतानाच सभापतींनी दुसऱ्या सदस्याला बोलण्याची परवानगी दिली. काही दिवसांपूर्वी खासदार शशी थरूर बोलत असताना त्यांचा मायक्रोफोन बंद करण्यात आला. यामुळे विरोधकांचा आवाज दडपला जात असल्याचा संदेश जातो, असा आरोप गोगोई यांनी केला आहे.
सुषमा स्वराज यांच्या वक्तव्याचा उल्लेख
गोगोई यांनी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या एका जुन्या वक्तव्याचा संदर्भ दिला. त्या म्हणाल्या होत्या की, भारतीय लोकशाहीची मूलभूत भावना अशी आहे की, आपण एकमेकांचे राजकीय विरोधक असू शकतो, परंतु शत्रू नाही. आज परिस्थिती अशी आहे की, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष किंवा इतर विरोधी पक्षांचे नेते जेव्हा सभागृहात बोलू इच्छितात, तेव्हा त्यांना पुरेशी संधी दिली जात नाही.
नेहरूंच्या वक्तव्याची आठवण
गोगोई यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख करत सांगितले की, नेहरू यांनी एकदा म्हटले होते की, सभापती हे देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक असतात. मात्र आज बोलण्याचे स्वातंत्र्यच दिले जात नाही.
अमेरिका-भारत व्यापार करारावर प्रश्न
गोगोई यांनी भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या व्यापार करारावरही प्रश्न उपस्थित केले. हा करार कोणत्या दबावाखाली करण्यात आला. एखाद्या उद्योगपती आणि एका मंत्र्याचे नाव आंतरराष्ट्रीय तपासात समोर आल्यामुळे भारतावर दबाव आणला गेला का, असा संशय त्यांनी व्यक्त केला. गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की देशाचे नेतृत्व केवळ स्वतःचे मत मांडते, परंतु इतरांचे मत ऐकत नाही.
किरेन रिजिजू यांचा पलटवार
दरम्यान, संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी गोगोई यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, मला गोगोई लहान भावासारखे आहेत, परंतु त्यांनी संसदीय परंपरा नीट समजून घ्याव्यात. पंतप्रधान असोत किंवा विरोधी पक्षनेते, सभागृहात बोलण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक असते. सत्ताधारी पक्षाने कधीही कागद फाडून सभापतींकडे फेकले नाहीत किंवा महासचिवांच्या टेबलवर चढण्यासारखे प्रकार केले नाहीत.
नेहरू आणि राजीव गांधींचा संदर्भ
रिजिजू यांनी पुढे सांगितले की, सुमारे चाळीस वर्षांनंतर लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. नेहरू आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसद आणि सभापतींच्या सन्मानाबद्दल केलेल्या वक्तव्यांचा संदर्भ देत त्यांनी म्हटले की, हा विषय केवळ एका पक्षाचा नसून संपूर्ण सभागृहाच्या प्रतिष्ठेशी संबंधित आहे.