दुसऱ्या पत्नीचाही पतीच्या निवृत्तिवेतनावर समान हक्क

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:31+5:302014-12-28T23:40:31+5:30

दुसऱ्या पत्नीचाही पतीच्या निवृत्तिवेतनावर समान हक्क

The second wife's equal rights on her husband's pension | दुसऱ्या पत्नीचाही पतीच्या निवृत्तिवेतनावर समान हक्क

दुसऱ्या पत्नीचाही पतीच्या निवृत्तिवेतनावर समान हक्क

सऱ्या पत्नीचाही पतीच्या निवृत्तिवेतनावर समान हक्क
हायकोर्टाचा निर्णय : महिला सक्षमीकरण चळवळीतील पुढचे पाऊल
राकेश घानोडे
नागपूर : पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या कौटुंबिक निवृत्तिवेतनात पहिल्या पत्नीसह दुसऱ्या पत्नीलाही समान वाटा दिला गेला पाहिजे, असा महिला हिताचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. सध्या हा नियम भारतीय रेल्वेतच असून शासनाच्या इतर विभागांतही या उदार भूमिकेचा अवलंब करावा, अशी अपेक्षा न्यायालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
या निर्णयात अतिशय महत्त्वपूर्ण तथ्य नोंदविताना न्यायालय म्हणाले, समाजात काय सुरू आहे हे आपण विसरू शकत नाही. अनेक पुरुष आधीच लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी सलगी वाढवितात. सत्य माहिती दडवून तिच्याशी दुसरे लग्न करतात. यात त्या महिलेची काहीच चूक नसते. देशात अशा प्रकरणांची संख्या फार मोठी आहे. परंतु पक्षकार हिंदू असल्यास हिंदू विवाह कायद्यानुसार असे विवाह अवैध ठरतात. न्यायालये या कायद्याच्या विरोधात निर्णय देऊ शकत नाही. पण नवऱ्याच्या मृत्यूनंतर पहिल्या पत्नीला सर्व लाभ देऊन दुसऱ्या पत्नीला उपासमार होण्यासाठी सोडून द्यावे काय, हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर गांभीर्याने व महिला सशक्तीकरण चळवळीला लक्षात ठेवूनच द्यावे लागेल, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
राज्यघटनेच्या अनुच्छेद १५ अनुसार लिंगाच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. अनुच्छेद ३९ (ए) मध्ये पुरुष व महिलांना समान पद्धतीने संरक्षण करणे, तर अनुच्छेद ३९ (ई) मध्ये महिलांना आरोग्य व शक्ती प्रदान करणे अपेक्षित आहे. रेल्वे कर्मचारी निवृत्तिवेतन योजनेतील नियम ७५ मधील उपनियम ७ (आय)(ए) मध्ये पहिल्या व दुसऱ्या पत्नीमध्ये निवृत्तिवेतनाचे समान वाटप करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद राज्यघटनेचा उद्देश साध्य करणारी आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
२८ जानेवारी २०१४ रोजी केंद्रीय प्रशासकीय लवादाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पहिल्या व दुसऱ्या पत्नीला कौटुंबिक निवृत्तिवेतन समान भागात विभागून देण्याचा आदेश दिला होता. याविरुद्ध रेल्वेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हिंदू विवाह कायद्याच्या कलम ११ अनुसार पहिली पत्नी जिवंत असेल आणि तिच्यासोबत घटस्फोट झाला नसेल तर दुसऱ्या महिलेसोबत केलेला विवाह अवैध ठरतो, असे रेल्वेचे म्हणणे होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे निरीक्षणे नोंदवून रेल्वेची याचिका खारीज केली.
सर्वत्र लागू करा नियम
पतीच्या निवृत्तिवेतनात दुसऱ्या पत्नीलाही समान वाटा देण्याचा नियम केंद्र व राज्य शासनाच्या सर्व विभागांमध्ये लागू करण्याची अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली आहे. या नियमानुसार निवृत्तिवेतन समान पद्धतीने विभागून दिले जात असल्यामुळे कोषागार किंवा करदात्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत नाही. महिला सक्षमीकरण चळवळीतील हे पुढचे पाऊल आहे. राज्य व केंद्र शासनाच्या सर्व विभागांमध्ये हा नियम लागू करण्यास काहीच हरकत नसायला पाहिजे. या नियमामुळे दुसरे लग्न केलेल्या असंख्य दुर्दैवी महिलांना अन्न व निवारा उपलब्ध होऊ शकतो, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

Web Title: The second wife's equal rights on her husband's pension