वेलडन रुखसाना...! पाकिस्तानी आयएसआय एजंटची मुलगी, नात भारतात तीन दशके हेरगिरी करत होते; एक तक्रार केली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 10:37 IST2026-02-17T10:36:21+5:302026-02-17T10:37:08+5:30
Pakistani woman spy Meerut : मेरठमध्ये पाकिस्तानी हेरगिरीचा पर्दाफाश! ३ दशकांपासून भारतात राहणाऱ्या महिलेला अटक; ISI शी कनेक्शन आणि स्लीपर सेल बनवल्याचा आरोप

वेलडन रुखसाना...! पाकिस्तानी आयएसआय एजंटची मुलगी, नात भारतात तीन दशके हेरगिरी करत होते; एक तक्रार केली अन्...
मेरठ: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पोलिसांनी एका मोठ्या संशयास्पद हेरगिरी प्रकरणाचा छडा लावला आहे. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात राहणाऱ्या सबा फरहत उर्फ नाजिया या पाकिस्तानी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेवर देशाची गोपनीय माहिती सीमेपलीकडे पाठवणे आणि स्लीपर सेल तयार करणे असे खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत.
सबा फरहत ही १९८८ मध्ये मसूद नावाच्या व्यक्तीशी निकाह केल्यानंतर 'लॉन्ग टर्म व्हिसा'वर भारतात आली होती. मात्र, ३ दशके उलटूनही तिने भारतीय नागरिकत्व घेतले नव्हते. मेरठच्या जली कोठी परिसरात ती राहत होती. तक्रारदार रुखसाना यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला असता, सबाचे वोटर आयडी आणि इतर कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले.
बनावट पासपोर्ट आणि परदेश दौरे
सबाने केवळ स्वतःचेच नव्हे, तर तिची मुलगी एनम हिचे देखील बनावट भारतीय पासपोर्ट बनवले होते. एनमचा जन्म १९९३ मध्ये पाकिस्तानमध्ये झाला होता आणि तिला पाकिस्तानी पासपोर्टवर भारतात आणले गेले होते. भारतीय नागरिकत्व नसतानाही या मायलेकींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानसह अनेक देशांचा प्रवास केल्याचे तपासात समोर आले आहे.
ISI कनेक्शन आणि हेरगिरीचा संशय
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे सबाचे वडील हनीफ हे पाकिस्तानात 'आयएसआय' एजंट असल्याचे सांगितले जात आहे. सबा आणि तिची वकील मुलगी एनम या दिल्लीतील विविध मंत्रालये आणि लष्करी भागांत फिरून गोपनीय माहिती गोळा करत असत, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. भारतात स्लीपर सेल सक्रिय करण्यातही त्यांचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलिस कारवाई
मेरठचे एसपी सिटी आयुष विक्रम यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि विनापरवाना परदेश प्रवास केल्याप्रकरणी सबा फरहतला अटक करण्यात आली आहे. या नेटवर्कमध्ये आणखी कोणाकोणाचा समावेश आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.