सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीने जोर धरला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 06:12 AM2021-10-18T06:12:07+5:302021-10-18T06:12:34+5:30

राजस्थानच्या स्थितीवर अशोक गेहलोत व काँग्रेस नेत्यांत चर्चा

Rebels press for Sachin Pilot as Rajasthan CM amid Ashok Gehlot brass talks | सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीने जोर धरला

सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीने जोर धरला

Next

नवी दिल्ली : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना आता त्या राज्याचे मुख्यमंत्री करावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून पुन्हा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील राजकीय स्थितीबाबत  मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, के.सी. वेणुगोपाल आदी नेत्यांशी चर्चा केली. राजस्थानच्या मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आटोपल्यानंतर शनिवारी रात्री राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, प्रदेश काँग्रेसमध्ये विविध पदांवरील नियुक्त्या याबाबतही लवकरच निर्णय घेण्याचे या चर्चेत ठरविण्यात आले. राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ विस्तार व्हावा तसेच संघटनात्मक बदल करावेत, अशी मागणी सचिन पायलट व त्यांच्या समर्थकांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात केली होती. मात्र त्यादिशेने अद्याप काहीच हालचाल न झाल्यामुळे पायलट व त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. 

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत सरकारला १७ डिसेंबर तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. कोरोना साथीचा काळामध्ये राजस्थानविषयी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे काँग्रेसने टाळले होते. पण  ती प्रक्रिया काँग्रेस नेतृत्वाने आता सुरू केली आहे.

या राज्यामध्ये दोन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकांचे निकाल २ नोव्हेंबरला लागणार आहेत. राजस्थानच्या मंत्रिमंडळात सध्या नऊ पदे रिकामी आहेत. निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर व दिवाळीनंतर राजस्थान मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

मतभेद कमी करण्यावर भर
राजस्थानमध्ये २०२३ साली विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या राज्यात काँग्रेसमधील मतभेद कमी करण्यावर पक्षश्रेष्ठींनी भर दिला आहे. अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील मतभेद खूप वाढले, तर विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला प्रसंगी पराभव पत्करावा लागेल याची जाणीव असल्याने राजस्थानबाबत पक्षश्रेष्ठी आता सावधपणे निर्णय घेत आहेत.

Web Title: Rebels press for Sachin Pilot as Rajasthan CM amid Ashok Gehlot brass talks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.