मोबाईल रिचार्ज संपताच इनकमिंग कॉल आणि SMS बंद का होतात? खासदार राघव चड्ढा यांनी राज्यसभेत मांडला लोकांचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:22 IST2026-03-11T13:20:43+5:302026-03-11T13:22:45+5:30
Raghav Chadha on Mobile Recharge Validity: मोबाईल रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग आणि एसएमएस बंद करण्याच्या कंपन्यांच्या धोरणावर खासदार राघव चड्ढा संतापले. राज्यसभेत उपस्थित केला प्रश्न.

मोबाईल रिचार्ज संपताच इनकमिंग कॉल आणि SMS बंद का होतात? खासदार राघव चड्ढा यांनी राज्यसभेत मांडला लोकांचा प्रश्न
नवी दिल्ली: मोबाईल रिचार्जची व्हॅलिडिटी संपल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ग्राहकांचे इनकमिंग कॉल्स आणि एसएमएस बंद करण्याच्या टेलिकॉम कंपन्यांच्या धोरणाबाबत आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. या धोरणामुळे देशातील कोट्यवधी गरीब आणि मध्यमवर्गीय मोबाईल धारकांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राघव चड्ढा यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला की, "रिचार्ज संपल्यावर आउटगोइंग कॉल बंद होणे समजू शकतो, पण इनकमिंग कॉल्स आणि विशेषतः एसएमएस का बंद केले जातात? आज सर्व बँकिंग व्यवहार आणि सरकारी सेवा 'ओटीपी'वर आधारित आहेत. जर एसएमएस सेवा बंद झाली, तर एखादा सामान्य माणूस आपले बँक खाते किंवा इतर अत्यावश्यक सेवा कशा वापरणार?"
TRAI कडे कारवाईची मागणी
टेलिकॉम कंपन्या केवळ नफा कमवण्यासाठी ग्राहकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्वी व्हॅलिडिटी संपल्यानंतरही अनेक दिवस इनकमिंग सेवा सुरू असायची, मात्र आता कंपन्यांनी हे नियम बदलले आहेत. सरकारने आणि 'ट्राय'ने या प्रकरणात हस्तक्षेप करून टेलिकॉम कंपन्यांना इनकमिंग कॉल आणि एसएमएस सेवा सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी चड्ढा यांनी केली आहे.