'डाव्यांची जोडी तोडण्याची वेळ आली; मंदिराचे सोने चोरणारे तुरुंगात जातील', पीएम मोदींचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:34 IST2026-01-23T15:32:55+5:302026-01-23T15:34:12+5:30
PM Narendra Modi Kerala Visit: पंतप्रधान मोदींनी केरळमधून डावे आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली.

'डाव्यांची जोडी तोडण्याची वेळ आली; मंदिराचे सोने चोरणारे तुरुंगात जातील', पीएम मोदींचे टीकास्त्र
PM Narendra Modi Kerala Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या केरळ दौऱ्यात अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. यानंतर तिरुवनंतपुरम येथील जाहीर सभेतून डावे आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. पीएम मोदींनी भ्रष्टाचार आणि शहराच्या दीर्घकाळ झालेल्या दुर्लक्षाचा आरोप करत, गुजरातप्रमाणे केरळमध्येही भाजपाचा उदय होत असून, तिरुवनंतपुरमला मॉडेल शहर बनवले जाईल, असा दावा त्यांनी केला.
डावे आणि काँग्रेसमुळे तिरुवनंतपुरम मागे पडले
पंतप्रधान मोदी म्हणाले, दशकानुदशके डाव्यांनी तिरुवनंतपुरमवर अन्याय केला. LDF आणि UDF या दोघांनीही तिरुवनंतपुरमकडे दशकानुदशके दुर्लक्ष केले. त्यामुळे शहर पायाभूत सुविधा आणि विकासापासून वंचित राहिले. डावे आणि काँग्रेसच्या भ्रष्टाचारामुळे येथील जनतेला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले. आता असे होणार नाही. मंदिरातून सोने चोरी करणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जाईल, ही मोदींची गॅरंटी आहे.
PM Shri @narendramodi addresses a massive public meeting in Thiruvananthapuram, Kerala.
— BJP (@BJP4India) January 23, 2026
https://t.co/1nNdJIb21Y
गुजरातपासून वाटचाल सुरू झाली
इथे उपस्थित असलेले काही डाव्या विचारसरणीचे गट मला कदाचित पसंत करत नसतील. पण सत्य सांगतो, 1987 पूर्वी गुजरातमध्ये भाजप एक लहान पक्ष होता. 1987 मध्ये प्रथमच अहमदाबाद महानगरपालिकेवर भाजपाचे नियंत्रण आले. अगदी त्याचप्रमाणे, अलीकडेच तिरुवनंतपुरममध्येही भाजपाला यश मिळाले आहे. ज्या प्रकारे गुजरातच्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, तसाच विश्वास केरळमधील जनता आता भाजपावर ठेवू लागली आहे.
सबरीमला मंदिरावरुन LDF सरकारवर आरोप
पंतप्रधान मोदींनी सबरीमला अयप्पा मंदिराचा उल्लेख करत म्हटले, भगवान अयप्पांच्या मंदिरावर देशभरातील लोकांची श्रद्धा आहे. मात्र LDF सरकारने मंदिराला हानी पोहोचवण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. येथे सोन्याची चोरी होत आहे. भाजप सत्तेत येताच या आरोपांची सखोल चौकशी होईल आणि दोषींना जेलमध्ये पाठवले जाईल.
आता जोडी तोडण्याची वेळ आली
पंतप्रधानांनी त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे उदाहरण देत सांगितले, त्रिपुरामध्ये 30 वर्षे डाव्यांचे सरकार होते. जनता त्रस्त झाल्यावर भाजपाला संधी दिली आणि आज तिथे भाजपाची सत्ता आहे. बंगालमध्ये 35 वर्षे डाव्यांचे राज्य होते; आज त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारही मिळत नाहीत. त्यामुळे आता ही जोडी तोडण्याची वेळ आली आहे.